नागपूर :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि दुचाकी-चारचाकी वाहने खरेदीसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. सोन्याचे दर वाढल्यानंतरही ग्राहकांनी आवडीचे दागिने, नाण्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सुरक्षित गुंतवणूक ही सोन्याची वाटत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदीवर भर देताना दिसून आले. एकूणच पाहता गुढीपाडव्याला सर्वच बाजारपेठांमध्ये जवळपास २५० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
सोन्यात १०० कोटींची उलाढालगुढीपाडव्याला नागपुरात १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याची माहिती नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली. ते म्हणाले, शुभमुहूर्तदिनी सराफाचे सर्व शोरूम आणि दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. लोकांनी दागिन्यांसह नाण्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. गुढीपाडव्याला महाराष्ट्रीय सोने खरेदी करायचे, पण यंदा अन्य धर्मीयांनी सोने खरेदी केली या निमित्ताने गुंतवणूक केली. आधीच बुकिंग केलेल्यांनी यादिनी सोने घरी नेले. शिवाय अनेकांनी अक्षयतृतीयेची सोने घरी नेण्यासाठी गुढीपाडव्याला बुकिंग केले. हा नवीन ट्रेंड यंदा बघायला मिळाला.