देवलापार : रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. विविध कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किडींची प्रतिकारशक्ती वाढत असल्याने पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण कायम आहे. यावर उपाय निंबोळी अर्क सर्व पिकांवर फायदेशीर आहे, असे प्रतिपादन धनश्री निघोट या विद्यार्थिनीने उसरीपार (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांच्या कार्यशाळेत केले.
यावेळी धनश्री निघोट हिने कडुनिंबाच्या बियांपासून निंबोळी अर्क तयार करणे व त्याचे पावडर तयार करण्याची कृती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली. या अर्क व पावडचा वापर कसा, कधी व कोणत्या पिकावर करायचा, याबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापराचे दुष्परिणाम समाजावून सांगत धनश्री निघोट हिने शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया कशी करायची, पिकांवरील विविध रोग व किडी, तसेच त्यांच्या व्यवस्थापनासाठी काय करायचे, फवारणी कशी करायची, गुरांवरील आजार, त्यावरील उपचार, गुरांची काळजी कशी घ्यायची यासह शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहितीही तिने शेतकऱ्यांना दिली. यावेळी नितेश सोनवाणे, कृषी सहायक शोभा खानवटे, शाश्वती डोके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.