नागपूर : शालेय जीवनात बालमनावर संस्कार घडतात. याच काळात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन गरजेचे असते. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे, अशा भावना आज शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी येथे व्यक्त केल्या.
११ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) विजय चव्हाण उपस्थित होते. रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचे चेतना तिडके म्हणाल्या.
- विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे
विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन विजय चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून केले. रवींद्र भुयार म्हणाले की, अपघाताची कारणे फार छोटी असतात, त्याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लावा, असे आवाहनही त्यांनी केले. संचालन कांचन देशपांडे यांनी केले.
- ‘रोड रेस गेम’मधून जनजागृती
वर्धेचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी ‘रोड रेस गेम’बद्दल माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. यावेळी अपघातविरहित अनेक वर्षे सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच जनआक्रोश, रोड मार्क, जनजागरण आदी संस्थांचा सत्कार करण्यात आला.