नागपूर : शंभर वर्ष पूर्ण करत असलेल्या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईडच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यातही पाली प्राकृत, बुद्धिस्ट स्टडिज आणि आंबेडकर थॉट्स या विभागातील विद्यार्थ्यांना गाईडची मोठी वानवा आहे. अनेक विद्यार्थी पेट परीक्षा पास करूनही गाईडच्या प्रतीक्षेत दिवस घालवत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला. पीएच.डी. करून इच्छिणारे अनेक विद्यार्थी ही परीक्षा पास झाले. परंतु विद्यापीठात आवश्यक ते नुसार पी.एचडी.साठी मार्गदर्शन करणारे गाईड उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी संशोधन कार्यापासून वंचित राहत आहेत. मागील वर्षी पास झालेले अनेक विद्यार्थी अजूनही गाईडपासून वंचित आहेत. या संशोधन विद्यार्थ्यांचे एक वर्ष गाईड शोधण्यातच निघून गेले. पाली, बुद्धिस्ट स्टडीज व आंबेडकर थॉट्स या विभागातील विद्यार्थ्यांना सध्या तरी ही मुख्य अडचण येत आहे, परंतु ही समस्या विद्यापीठातील बहुतांश विभागात असल्याचे सांगितले जाते.
- विद्यार्थ्यांसाठी आज बैठक
बुद्धिस्ट स्टुडंड असोसिएशनद्वारे आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता उर्वेला कॉलनी येथील बानाईच्या आंबेडकर सभागृहात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पेट, नेट परीक्षा पास झालेले व पेट, नेटची तयारी करत असलेले विद्यार्थी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र व सचिव उत्तम शेवडे यांनी म्हटले आहे.