नागपूर : ऑनलाइन टास्क देऊन नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण मागील काही महिन्यांपासून प्रचंड वाढले आहे. ‘टास्क’च्या नावाखाली होणाऱ्या या फसवणुकीचे गुजरात ‘कनेक्शन’ समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी गुजरातच्या वडोदरा येथून दोन सायबर ठगांना अटक केली असून त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कमदेखील गोठविण्यात आली आहे.
मुकेश जयेशभाई पिपलिया (३४, सिद्धार्थ इन्क्लेव्ह, ओल्ड छन्नी रोड, वडोदरा, गुजरात) व अर्शद ऊर्फ अमन हुसेन पठाण (३०, चिस्तीया नगर, छानी जकात नाका, जुना छानी रोड, वडोदरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २७ एप्रिल रोजी दुर्गेश्वर श्रीराम गिऱ्हेपुंजे (३७, नरसाळा) यांच्या मोबाइलवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली मॅसेज आला. या कामासाठी गिऱ्हेपुंजे यांनी सहमती दर्शविल्यावर त्यांना काही यूट्यूब चॅनल्सच्या लिंक पाठविण्यात आल्या व त्यांना सबस्क्राइब केल्याचे स्क्रीनशॉट्स पाठवायला सांगण्यात आले. त्यांना त्यानंतर टेलिग्रामची एक लिंक पाठविण्यात आली. गिऱ्हेपुंजे यांनी लिंकवर दिलेेली माहिती भरली व पुढील निर्देशानुसार त्यांनी क्यूआर कोड पाठविला. काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यात दीडशे रुपये जमा झाले. त्यानंतर त्यांना नवीन लिंक पाठविण्यात आली व त्यांना २५ टास्क देण्यात आले. ते टास्क पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये काही रक्कम गुंतवावी लागत होती व टास्क पूर्ण केल्यानंतर कमिशनसह रक्कम मिळत असल्याचे त्या लिंकवर दिसत होते.
नफ्याच्या मोहात गिऱ्हेपुंजे यांनी ६.०२ लाख रुपये गुंतविले. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी टास्क येणे बंद झाले. २९ एप्रिल रोजी आरोपींनी परत लिंक पाठवून टास्क दिला व त्यासाठी रक्कम भरण्यास कळविण्यात आले. परंतु त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिला व अगोदरचे पैसे परत मागितले. मात्र त्यांना कुठलीही रक्कम परत मिळाली नाही. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गिऱ्हेपुंजे यांनी पाठविलेली रक्कम नेमकी कुठल्या खात्यात गेली याचा सायबर पोलिसांनी तपास केला. त्यातून वडोदरा येथील या दोन आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर पोलिसांच्या पथकाने वडोदरा येथे जाऊन आरोपींना अटक केली. त्यांना नागपुरात आणण्यात आले व न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.