लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहरानजीक असलेल्या गुमगाव माॅयल वसाहतीत सध्या घाणीच्या समस्येने डाेके वर काढले आहे. या वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपेक्षित जीवन जगावे लागत असून, वसाहतीच्या दैनंदिन साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच आहे.
गुमगाव माॅयलमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५० वर्षांपूर्वी क्वाॅर्टरची निर्मिती करण्यात आली. या माॅयल वसाहतीत काम करणारे अनेक कामगार कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. परंतु या वसाहतीतील विविध समस्यांमुळे कर्मचारी कुटुंबीयांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने साफसफाई वा वसाहतीत रंगरंगाेटीसुद्धा केली नाही. परिणामी, वसाहत परिसरात सर्वत्र झुडपे वाढली असून, कचरा व घाण विखुरलेली दिसून येते. दुसरीकडे, परिसरात डुकरांचा मुक्तसंचार बघायला मिळत असून, उघड्या नाल्यांमुळे घाणीची समस्या अधिकच तीव्र हाेत आहे.
वसाहतीमधील सार्वजनिक नळ तसेच माेकळ्या भागात गवत वाढले आहे. घाणीमुळे डासांची पैदास वाढली असल्याने रहिवाशांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या वसाहतीत साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप वसाहतीतील रहिवाशांनी केला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून वसाहतीची समस्या साेडविण्याची मागणी रहिवासी नागरिकांनी केली आहे.