७६ लाखांची फसवणूक : गणेशपेठेत गुन्हा दाखल नागपूर : विविध साहित्याची इकडून तिकडे ने-आण करणाऱ्या नागपुरातील एका वाहतूक आणि कुरियर व्यावसायिकाला गुडगाव तसेच दिल्लीतील व्यावसायिकांनी ७६ लाखांचा गंडा घातला. सूरज रतनलाल अग्रवाल (वय ४५) असे पीडित व्यावसायिकाचे नाव आहे. सेंट्रल एव्हेन्यूवर अग्रवाल यांचे कॅरिअर्स आणि कार्गोचे कार्यालय आहे. गुडगाव आणि दिल्लीच्या व्यावसायिकांसोबत त्यांनी १ जून २०१६ ला साहित्याची इकडून तिकडे ने-आण करण्याचा करार केला होता. कराराप्रमाणे या व्यवसायाचे संबंधित व्यावसायिकांकडून अग्रवाल यांना ७६ लाख ६१ हजार २०९ रुपये घेणे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपींनी त्यांची रक्कम दिली नाही आणि करारानुसार व्यवहार न करता अग्रवाल यांची फसवणूक केली. त्यामुळे अग्रवाल यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर गुडगाव येथील क्वीक डेल लॉजिस्टीक (उद्योग विहार सेक्टर), अनुप विकल (संचालक, रा. जसफर), प्रवीण सिन्हा (प्रमोटर, क्वीकडेल लॉजिस्टीक), अभिजीतसिंग चौधरी (पब्लिक स्कूलजवळ, गॅलेरिया), आनंद राय (रोहिणी सेक्टर, न्यू दिल्ली) राहुल रॉय (संचालक, क्वीक डेल, लॉजिस्टीक, रोहिणी न्यू दिल्ली), रितेश कोटक (सीएफओ लॉजिस्टीक, प्रा.लि. जसफर इनफोटेक दिल्ली), रोहित बंसल (वोकला इंडस्ट्रीज स्नॅप डिल आॅफीस, उद्योग विहार सेक्टर गुडगाव) आणि कुणाल बहाल (वोकला इंडस्ट्रीज स्नॅप डिल आॅफिस, उद्योग विहार सेक्टर गुडगाव) यांच्याविरुद्ध गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)प्रकरण गुन्हेशाखेकडे फसवणुकीची रक्कम लक्षात घेता हे प्रकरण गुन्हेशाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. सर्व आरोपी गुडगाव आणि दिल्ली येथील रहिवासी असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक लवकरच तिकडे रवाना केले जाणार आहे.
गुडगाव-दिल्लीच्या व्यापाऱ्यांचा गंडा
By admin | Published: January 28, 2017 1:41 AM