नागपूर : लोकमत आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये गुरुदेव भक्तांनी उत्साहाने रक्तदान केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाश्रम येथे हे शिबिर हेडगेवार रक्तपेढीच्या सौजन्याने पार पडले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक यावले होते. मंडळाचे सचिव विठ्ठलराव पुनसे, सल्लागार देवीदास लाखे, डॉ. बाळ पदवाड, बाबाराव पाटील, सह प्रचार प्रमुख रामदास टेकाडे, घनश्याम रक्षक, कोषाध्यक्ष सात्विक ठवरे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रमिला शेटे प्रमुख पाहुणे होते.
ॲड. यावले यांनी प्रथमच होत असलेल्या या शिबिराबद्दल आनंद व्यक्त करून राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेले कार्य या माध्यमातून होत असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. शेटे यांनीही रक्तदानाची गरज आणि गैरसमज याबद्दल मार्गदर्शन केले.
ॲड. यावले यांनी स्वत: प्रथम रक्तदान करून शिबिराला प्रारंभ केला. रक्तदात्यांना गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने ग्रामदीप स्मरणिका आणि प्रार्थना पुस्तिका भेट देण्यात आली. सर्व रक्तदात्यांना सॅक बॅग, टिफीन बॅग तसेच अन्य भेटवस्तू देण्यात आल्या. संचालन सहसचिव राजेश कुंभलकर यांनी तर उपस्थितांचे आभार महिला समिती प्रमुख संगीता जावळे यांनी मानले. यावेळी सियाराम चावके, विठ्ठलराव तळवेकर, मुरलीधर नरड, पांडुरंग कडू, माजी नगरसेवक तन्वीर अहमद, राजू पवार, निखील भुते, रवि गाडगे, संजय नारेकर, नंदू लेकुरवाळे, रामकृष्ण परिहार, मनीष मोरे यांच्यासह रक्तपेढीचे प्रवीण पाटील, प्रीतीश आमले, कल्याणी गौरकर, जुनेद अन्सारी, अनुप बिल्लोकर यांचे सहकार्य लाभले.