विजय दर्डा यांनी केले गुरमुळे कुटुंबीयांचे सांत्वन नरखेड : ‘लोकमत’च्या प्रारंभापासून आनंदराव गुरमुळे गुरुजी यांनी वार्ताहर म्हणून सेवा दिली. त्यांच्यासारख्या निष्ठावंत आणि प्रामाणिक वार्ताहरांमुळेच ‘लोकमत’ आज महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे दैनिक होऊ शकले. त्यामुळे गुरमुळे गुरुजींची उणीव सदैव जाणवत राहील, असे भावोद्गार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा यांनी काढले. नरखेड येथील ‘लोकमत’चे ज्येष्ठ वार्ताहर आनंदराव गुरमुळे यांचे अलीकडेच निधन झाले. विजय दर्डा यांनी रविवारी दिवंगत गुरमुळे यांच्या निवासस्थानी जाऊन आनंदराव गुरमुळे यांच्या पत्नी पुष्पाताई यांचे सांत्वन केले. ‘लोकमतच्या पहिल्या दिवसांपासून गुरुजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली. शिक्षक म्हणून समाजात वावरत असताना ‘लोकमत’ वार्ताहर म्हणूनही त्यांनी समाजसेवा केली. अनेक समस्या त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सोडविल्या, असे सांगत विजय दर्डा यांनी गुरमुळे गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नरखेडचे नगरसेवक अभिजित गुप्ता, मुकेश शेंडे, नगरसेविका नंदा कुमरे, सोनम कळंबे, सुवर्णा वसुले, नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप हिवरकर, लोकमतचे तालुका प्रतिनिधी श्याम नाडेकर, माणिक वैद्य, लहू वैद्य, सुनील बालपांडे, बब्बू शेख, महेश मोहने, गुणवंत बांदरे, वार्ताहर अनिल बालपांडे, चंद्रशेखर दंढारे यांच्यासह लोकमतच्या संपादकीय, वितरण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गुरमुळे गुरुजींची उणीव जाणवत राहील!
By admin | Published: August 01, 2016 2:17 AM