रामटेक: रामटेक तालुक्यातील शितलवाडी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गुरुकुलनगराला यंदाही पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन येथील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यास उदासीन आहे. त्यामुळे अनेकांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुकुलनगरात बहुतांश शिक्षक राहतात. दरवर्षी पाऊस सुरु झाला की येथे सर्वांच्या मनात धडकी भरते. घराच्या बाहेर पडणेही बंद होऊन जाते. गुरुकुलनगरात दोन मोठ्या समस्या आहेत. जास्त पाऊस आल्यास गुरुकुलनगराच्या प्रवेश द्वारावरच चार फूट पाणी जमा होते. या ठिकाणी नालीचे काम करणे आवश्यक आहे. पण ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले आहे. यासोबत येथे मोठ्या नाल्या बांधल्या आहेत. बाजूला गवळण नाला वाहत आहे. त्या नाल्यातही नाली सोडलेली आहे. यात मोठी पायली टाकली आहे. त्यामुळे नालीचे पाणी नाल्यात जाण्याऐवजी घाण पाणी नालीद्वारे वस्तीत जमा होते. हेच पाणी विहिरीत जाते.
दुसरी समस्या आहे ती गवळण नाल्यावरील पुलाची आहे. हा पूल मोठा करणे आवश्यक आहे. सध्या या पुलाला तीन पायल्या टाकल्या आहेत. त्या पायल्या वर आल्या आहेत. त्यामुळे पाणी निघत नाही. या नाल्यावर अजून एक रपटा बनविला आहे. तोही कमी उंचीचा आहे. तेथे कचरा जमा होतो त्यामुळे पाणी अडते.
शितलवाडीच्या सरपंचांना या समस्या सांगितल्या तर नालीचे काम व नालीवर झाकण टाकण्याचे काम ग्रामपंचायत करणार आहे, असे सांगतात. पण त्यांना अद्याप या कामासाठी मुहूर्त सापडलेला दिसत नाही. माजी आमदार डी.एम.रेड्डी यांच्या पुढाकाराने नाल्यावर संरक्षण भिंत बांधली गेली. पण गुरुकुलनगरवासीयांच्या यातना कमी झालेल्या दिसत नाही. जि.प.सदस्य सतीश डोंगरे हे सुध्दा या कामासाठी निधी देऊ शकतात. त्यांनाही या समस्यांची जाणीव आहे. पण तरी याकडे दुर्लक्ष दिसते.
--
अति पाऊस झाला की गुरुकुलनगराला असा पुराचा वेढा पडतो.