लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अडकलेल्या कामगार तसेच नागरिकांना सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या नागपूरमार्गे धावत आहेत. यातील बहुतांश गाड्या अजनी आणि नागपूर रेल्वेस्थानकादरम्यान आऊटरवर तासन्तास थांबविण्यात येत आहेत. याचा फायदा घेऊन बाजूच्या झोपडपट्टीतील रहिवासी या गाड्यांतील कामगारांना पाणी, नाश्ता, भोजन, खर्रा अन् गुटख्याची सर्रास विक्री करीत आहेत. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासूून सुरू असून या गंभीर प्रकाराबाबत रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाला कानोकान खबर नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराची लेखी तक्रार खुद्द एका नगरसेवकानेच ‘डीआरएम’ कार्यालयात केली आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यायचे सोडून आरपीएफ आणि रेल्वेचे अधिकारी केवळ माध्यमांना रेल्वेस्थानकावर येण्यापासून रोखण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. अनेक नागरिकही विविध शहरात अडकले असल्यामुळे रेल्वे बोर्डाने राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या. मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वी या गाड्यांना आऊटरवर थांबविण्यात येत आहे. अजनी रेल्वेस्थानक ते नागपूर रेल्वेस्थानकाच्या दरम्यान या गाड्या थांबत आहेत. बराच वेळ आऊटरवर गाडी थांबल्यामुळे तहानलेल्या आणि भुकेल्या कामगारांची गैरसोय होत आहे. याचाच फायदा घेऊन शेजारील तकिया धंतोली झोपडपट्टीतील अनेकजण या गाड्यांतील कामगारांना पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची सर्रास विक्र्री करीत आहेत. नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहर रेड झोनमध्ये असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता हॉटेल्स, भोजनालये आणि इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांमध्ये या वस्तूंची सर्रास विक्री होत आहे. एखाद्या प्रसंगी श्रमिक स्पेशलमधील कामगाराला कोरोनाची लागण झालेली असल्यास शहरातील झोपडपट्टीतील सर्व नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक लखन सुमेरा येरवार यांनी ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याची भीती वर्तविण्यात येऊन या परिसरात बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे. रेल्वेस्थानकापासून काहीच अंतरावर अवैध व्हेंडरकडून नाश्ता, भोजन, गुटखा आणि खºर्याची विक्री होत असून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनालाही याबाबत माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.माध्यमांना बंदी, अवैध धंदे सुरूश्रमिक स्पेशल गाड्यांचे वृत्तांकन करण्यासाठी रेल्वेस्थानकावर गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यापासून रोखण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेस्थानकात प्रवेश करताना असलेला मार्ग आणि मेन गेटवर बंदोबस्त लावला आहे. परंतु रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर अवैध व्हेंडरकडून खाद्यपदार्थ तसेच गुटख्याची विक्री होत आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.विशेष मोहीम राबवू‘आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांतील कामगारांना खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या विरुद्ध तातडीने विशेष मोहीम सुरू करण्यात येऊन अवैध व्हेंडरचा बंदोबस्त करण्यात येईल.’-आशुतोष पाण्ड्येय, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ
प्लॅटफॉर्र्म रिकामे नसल्यास आऊटरवर थांबतात गाड्या‘रेल्वेस्थानकावर श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी आल्यानंतर या गाडीतील कामगारांना भोजन देण्यात येते. सर्व कामगारांना भोजन मिळाले की नाही याची खात्री केल्यानंतरच श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीला रवाना करण्यात येते. दरम्यान, या काळात इतर गाड्या आल्यास त्यांना आऊटरवर थांबविण्यात येते.’-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग