लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि अन्य संबंधित उत्पादनांसह स्वादिष्ट व सुगंधित सुपारीवरील प्रतिबंधाची मुदत पुन्हा एक वर्षासाठी वाढविली आहे. नागपुरातील मान्सून सत्रात अखेरच्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दोन्ही सभागृहात ही घोषणा केली.प्रतिबंधास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ही मुदत २० जानेवारी २०१८ च्या अधिसूचनेन्वये सहा महिन्यांसाठी होती. या आदेशाची मुदत १९ जुलै २०१८ ला संपुष्टात आली आहे. आता शासनाने एक वर्षाच्या कालावधीकरिता शुक्रवारी बंदीची घोषणा केली. जनहिताच्या दृष्टीने राज्यात उपरोक्त प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर प्रतिबंध राहील.गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग, ओरल फायब्रोसिस, ल्युकोप्लाकिया, हृदयरोग, श्वसनरोग असे आजार होण्याचा धोका असतो. तसेच सुपारीबरोबर स्वादिष्ट व सुगंधित अपमिश्रके मिसळली असता त्याच्या आकर्षकतेमध्ये वाढ होते. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता व्यापक जनहिताच्या अनुषंगाने गुटखा, पानमसाला व तत्सम तसेच स्वादिष्ट व सुगंधित सुपारी अन्न पदार्थांवर २० जुलै २०१८ पासून एक वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिबंध राहणार असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांना शासनाने कळविले आहे.गुटखा खाणाऱ्या मंत्री-आमदारांची यादी जाहीर करणारदरम्यान विधानसभेत या विषयावर सादर करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना भाजपचे आशिष देशमुख यांनी सांगितले की, गुटखाबंदीचा कायदा या सभागृहाने केला. परंतु कायदा करणाऱ्या या सभागृहातील अनेक सदस्य गुटख्याच्या आहारी गेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करणार का? यावर अन्न व औषध राज्यमंत्री मदन येरावार यांनी गुटखा खाणाºया सदस्यांची यादी जाहीर केली जाईल, असे सांगितले.संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईविजय वडेट्टीवार यांनी गुटख्यासंबंधीची लक्षवेधी विधानसभेत करताना सांगितले की, गुटखाबंदी असताना राज्यात सर्रास विक्री होते. याचे एक रॅकेट आहे. यात अधिकारीही सामील आहे. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री येरावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.