लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शहरात डेंग्यू, मलेरिया, विषाणूजन्य ताप व इतर कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढती आहे. शहरातील प्रभाग क्रमांक-२ मधील तुंबलेली गटारे, डुकरांचा मुक्तसंचार व डासांची पैदास पाहता स्थानिक नागरिकांच्या आराेग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. या बाबी नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या असल्या तरी स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने साफसफाईकडे कानाडाेळा केला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक-२ रेल्वेलाईन लगत आहे. येथील माेकळ्या जागेवर सांडपाणी गाेळा झाल्याने दलदल तयार झाली. अनुकूल जागा मिळाल्याने येथे डुकरांचाही वावर वाढला आहे. सांडपाणी व त्यातील सडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. शिवाय, माेठ्या प्रमाणात डासांची पैदास हाेत असल्याने या भागात मलेरिया, विषाणूजन्य ताप व इतर कीटकजन्य आजारांचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
शहराच्या साफसफाईची जबाबदारी स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडे आहे. नगर पंचायत नागरिकांकडून कराची वसुली करते. मग, त्यांनी शहराच्या साफसफाईसह नागरिकांना मूलभूत सुविधा वेळाच पुरवायला हव्या. नागरिकांच्या आराेग्याची काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली असून, या भागाची तातडीने साफसफाई करावी, डुकरांचा याेग्य बंदाेबस्त करावा, तसेच या भागात डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक २ व ३ मधील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
डेंग्यूचे १३३ रुग्ण
भिवापूर शहरासह तालुक्यात डेंग्यूचे आजवर एकूण १३३ रुग्ण आढळून आले असून, सर्व रुग्ण बरे झाले, अशी माहिती तालुका आराेग्य विभागाने दिली. यात खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार करणारे रुग्ण नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घर व घराचा परिसर साफ ठेवावा, पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, काेरडा दिवस पाळावा, असे आवाहन आराेग्य विभागाने केले असून, नगर पंचायत प्रशासनाने शहरात धूरळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
मुख्याधिकारीही प्रभारी
भिवापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांची काही दिवसांपूर्वी पनवेल येथे बदली झाल्याने सध्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे आहे. या नगर पंचायतीला अद्यापही नवीन मुख्याधिकारी नियुक्त करण्यात आला नाही. नगर पंचायतीचे पदाधिकारी व नगरसेवक केवळ राजकारणात मग्न असून, त्यांनाही नागरिकांच्या आराेग्याचे काही घेणेदेणे नाही.