आठवडाभरात आठ गुन्हे दाखल : टोळीतील इतर सदस्य भूमिगत नागपूर : पोलीस संपूर्ण ग्वालबन्सी टोळीविरुद्ध आपली पकड मजबूत करीत असल्याने ग्वालबन्सीशी संबंधित लोकं बचावासाठी विविध पक्षातील राजकीय नेत्यांकडे चकरा मारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ग्वालबन्सी टोळीचे समर्थक नेत्यांच्या भेटी घेऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दिल्ली-मुंबईच्या चकराही मारल्या आहेत. परंतु कुठलेही यश हाती लागले नाही. सर्वच पक्षात वर्चस्व असल्याने ग्वालबन्सी कुटुंबीयांचे दिग्गज नेत्यांसोबतही संबंध आहेत. त्यांच्याकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने त्यांनी अभियान चालविले आहे. त्यांनी शनिवारी एका हॉटेल संचालकाच्या माध्यमातून दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. ग्वालबन्सी टोळीचे समर्थक भूपेश सोनटक्के प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासूनच नेत्यांच्या शरणात जात आहेत. दरम्यान पोलिसांनी दिलीप ग्वालबन्सीचे भाऊ नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, पुतण्या शैलेश ग्वालबन्सी, आलोक महादुलेसह १५ ते २० लोकांविरुद्ध खंडणी वसुली आणि दंगाप्रकरणी गुन्हे दाखल करताच टोळीतील बहुतांश सदस्य भूमिगत झाले आहेत. शहर पोलिसांनी ग्वालबन्सी टोळीविरुद्ध एकूण आठ प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यात जमीन हडपणे, मारहाण, दंगा, खंडणी वसुली, छेडखानी आणि अॅट्रोसिटी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. भूपेश सोनटक्के यांना आत्महत्या करण्यास मजबूर केल्याप्रकरणी २० एप्रिल रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर २३ एप्रिल रोजी कळमेश्वर येथील ६० वर्षीय रुख्माबाई गजानन वैद्य यांची शेती हडपल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात दिलीप ग्वालबन्सी, त्याचे दोन पुतणे, कळमेश्वर नगरपालिकेचे उपाध्यक्ष सरजू मंडपे, नगरसेवक नामदेव वैद्य, भाजपा पदाधिकारी शरद तिवारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आतापर्यंत सहा इतर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्वालबन्सी कुटुंबीयांचा काटोल रोड ते कोराडी रोड दरम्यानच्या परिसरात अनेक वर्षांपासून दबदबा आहे. स्थानिक राजकारणातही त्यांचे वर्चस्व आहे. राजकारणात वर्चस्व असल्यामुळेच ते जमीन हडपण्याच्या धंद्यात उतरले. दिलीपने कुटुंबीय व साथीदारांच्या मदतीने अनेक खासगी आणि शासकीय जागा आपल्या ताब्यात घेतल्या. या जमीन हडपण्याचे कार्य ते गरिबांचे कैवारी म्हणून करतात. गरिबांकडून काही रक्कम घेऊन त्या जागेवर टीनाचे शेड टाकून दिले जाते. जमीन मालक किंवा प्लॉट मालक त्या जागेवर गेल्यास त्याला आपला जीव मुठीत घेऊन पळावे लागते. मदतीसाठी ते जेव्हा पोलिसांकडे जातात तेव्हा ‘झोपडपट्टी हटविणे आपले काम नाही’, असे म्हणत पोलीसही त्यांना परत पाठवितात. खूप दबाव आलाच तर एखाद दुसऱ्या प्रकरणात केवळ खानापूर्ती म्हणून गुन्हा दाखल केला जातो. प्रभावशाली व्यक्तीची जागा असल्याने ग्वालबन्सी हे झोपडपट्टीवासीयांवर सर्व दोष टाकून आपले हात वर करतात. परंतु नंतर मात्र मोठी रक्कम मिळाली, तर एकाच इशाऱ्यावर संपूर्ण झोपडपट्टी दुसऱ्या जागेवर शिफ्ट होते. ग्वालबन्सी कुटुंबीयांचा मनपा, स्थानिक प्रशासन आणि राजकारणात प्रभाव आहे. त्यामुळे पीडितांना शासकीय विभागांकडून मदत मिळत नाही. पीडितांना त्यांच्या स्वत:च्या जागेची मोजणी किंवा अतिक्रमण हटविण्यासाठीही मदत मिळत नाही. उलट ग्वालबन्सी समर्थकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर पीडित जमीन धारकांनाच त्रास दिला जातो. मनपा, नासुप्र, सिटी सर्व्हे, दुय्यम उपनिबंधक कार्यालय यासारख्या शासकीय विभागातील काही कर्मचारी व अधिकारी ग्वालबन्सी यांच्या निर्देशांचे पालन करीत खऱ्या मालकांना त्रस्त करीत तडजोड करण्यास बाध्य करतात. याची कसून चौकशी करीत या विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. दरम्यान रुख्माबाई वैद्य प्रकरणात आरोपी कळमेश्वर नगरपालिकेचे उपाध्यक्ष सरजू मंडपे आणि नगरसेवक नामदेव वैद्य यांना न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांचे वकील अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी सांगितले की, दोन्ही प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पोलिसांनी खूप विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ कळमेश्वर असूनही गुन्हा मात्र गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सात लाख रुपये खंडणी मागितली सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बाबाराम डोमणे यांना हजारी पहाड येथील त्यांच्या प्लॉटवरील कब्जा सोडण्याच्या मोबदल्यात नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, त्याचा पुतण्या शैलेश, आलोक महादुले व साथीदारांनी सात लाख रुपयाची खंडणी मागितली होती. त्याचप्रकारे प्रमोद अहीरे नावाच्या पीडिताला हरीशने फोन करून पोलिसांत तक्रार केल्या पाहून घेण्याची धमकी दिली होती. हरीशच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.(प्रतिनिधी)
ग्वालबन्सी समर्थकांची नेत्यांकडे धाव
By admin | Published: May 01, 2017 1:01 AM