नागपूर : गळफास घेऊन आत्महत्या करणारी डॉ. रुचिता रेवतकर चार वर्षांपासून अत्याचार सहन करीत होती. तिच्यावर डॉक्टर पती क्लिनिक आणि मशीन खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकत होता. मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने रुचिताला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर हताश झालेल्या रुचिताने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नरेंद्रनगर येथील उपेंद्र अपार्टमेंटमधील डॉ. रुचिताच्या आत्महत्या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पती डॉ. मंगेश रेवतकर आणि त्याच्या आईला आरोपी केले आहे. रुचिता मूळची पांढुर्णा येथील तर मंगेश नरखेड येथील रहिवासी आहे. रुचिताचा भाऊही डॉक्टर आहे. तिची बहीण नंदनवनमध्ये राहते. रुचिताचे २०१६ मध्ये मंगेशसोबत लग्न झाले होते. त्यावेळी मंगेश वर्धा येथे कार्यरत होता. सूत्रांनुसार लग्नानंतरच मंगेश रुचिताला त्रास देत होता. एका वर्षानंतर मुलगा झाल्यामुळे रुचिताला आपला त्रास कमी होईल असे वाटले. परंतु मातृत्वाचे सुख मिळाल्यानंतर पुन्हा तिला त्रास देण्यात येऊ लागला. मंगेश नागपुरात आला. येथे आल्यानंतर रुचिताच्या यातना आणखी वाढल्या. त्याने क्लिनिक सुरू करून नव्या मशीन आणायच्या असल्याचे सांगून रुचिताला माहेरून ५० लाख रुपये आणण्यास सांगितले. रुचिताचे आई-वडील मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरू आहे. ही रक्कम देणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे रुचिताने पैसे आणण्यास नकार दिला. मागणी पूर्ण न झाल्यामुळे मंगेश संतप्त झाला. त्याने रुचिताचे जगणे असह्य करून टाकले. रुचिताने ही बाब आईवडिलांना सांगितली. तीन दिवसांपूर्वी रुचिताने नरखेडला आपल्या सासरी सामूहिक बैठकही आयोजित केली. या बैठकीत मंगेशलाही बोलावल्यामुळे तो संतप्त झाला. त्याने बैठकीत येण्यास नकार दिला. त्याने नरखेडवरून परतल्यानंतर रुचिताला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रुचिता हतबल झाली. तिने आईला फोन करून आपबीती सांगितली. आपली जगण्याची इच्छा संपल्याचे सांगून तिने फोन ठेवला. तिच्या आईने धोका ओळखून रुचिताच्या बहिणीला माहिती दिली. बहिणीने फोन केल्यानंतर रुचिताने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ती त्वरित रुचिताच्या घरी पोहोचली. परंतु त्यापूर्वीच रुचिताने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुचिताने सुसाईड नोटमध्ये आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोट आणि रुचिताच्या आईच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
..............