नागपूर : भारतीय हवामान विभागाने आजपासून विदर्भ, मराठवाडा, दक्षिण काेकणात विजा, वादळ आणि गारपीटीसह जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविली आहे. १६ व १७ मार्च राेजी नागपूरसह चंद्रपूर व गडचिराेली या जिल्ह्यांत सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अमरावती, अकाेला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात १६ मार्च आणि भंडारा व गाेंदियात १७ मार्च राेजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे १४ मार्च राेजी सायंकाळच्या दरम्यान नागपुरात पावसाने हजेरी लावली. सलग पडला नसला तरी ठिकठिकाणी पावसाचे थेंब पडले. १२ तासात ०.२ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे रात्रीचा पारा काही अंशी घटला. विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात ढगाळ वातावरण हाेते. बुधवारी दिवसभर आकाश ढगाळलेले असले तरी दिवसाचे तापमान स्थिर हाेते. मात्र पुढचे दाेन दिवस पावसामुळे अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पावसाळी स्थिती त्यापुढे दाेन दिवस राहणार असून १९ मार्चपर्यंत विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
समुद्रसपाटीपासून ४ ते ५ किमी. उंचीवर असणारा व देशाचा ४० टक्के असा मध्यवर्ती भूभाग कव्हर करीत पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा ‘आस’ व त्याच्या खालच्या पातळीतून उलट दिशेने बंगालच्या उपसागराहून वाहणारे आर्द्रतायुक्त वारे यांच्या मिलाफ क्रियेतून घडणाऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे लगतच्या राज्याबरोबर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे.
शेतीला नुकसान, टिनाच्या घरांनी सावध
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. याकाळात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते, असे विभागाच्या पूर्वानुमानत म्हटले आहे. वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
हवामान विभागातर्फे दिलेल्या अतिसतर्कतेच्या इशारानुसार नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकऱ्यांनीही शेतातील पिकांची काळजी घ्यावी.
- विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त