- जितेंद्र ढवळेनागपूर - काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे. रॅलीसाठी महिला आणि युवकात मोठा उत्साह दिसून येतो आहे. देशात परिवर्तनाचा संकल्प करीत‘हैं तयार हम' चे फ्लेक्स हातात उंचावत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सभास्थळी दाखल होत आहेत."मैदानावर तीन भव्य सभामंच
महारॅलीसाठी भारत जोडो मैदानावर तीन भव्य सभामंच (स्टेज) उभारण्यात आले आहेत. प्रत्येक मंच १०० बाय ६० फुटांचा आहे. मध्यभागी असलेल्या मंचावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह कार्यसमितीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. या मंचावर शंभर लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच मंचारून नेते परिवर्तनाचा संदेश देत कार्यकर्त्यांत जोश भरतील. दुसऱ्या मंचावर इतर राज्यांतील नेते, खासदार आणि आमदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, खासदार, आमदार, माजी मंत्री उपस्थित राहतील.
देशभरातील नेते दाखलमहारॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातील नेत्यांचे बुधवारपासून नागपुरात आगमन सुरू आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर शहर काँग्रेसच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी, अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इमरान प्रतापगडी, अल्का लांबा, पवन बन्सल, अजय माकन, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला हेही नागपुरात दाखल झाले आहे.