नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हज यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याच्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांनी आज, शुक्रवारी याचिकेवर सुनावणी करून भारतीय विमानतळ प्राधिकरण, राज्य शासन व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी १३ आॅक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पहिल्या हज विमानाने २६५ यात्रेकरूंचा जत्था रवाना होणार होता. यात्रेकरू २२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता हज हाऊस येथे पोहोचले होते. त्यांना मध्यरात्रीनंतर २ वाजता विमानतळावर सोडण्यात आले. २.३० वाजता यात्रेकरूंना विमानात बसविण्यात आले. विमान उड्डाण भरण्यास सज्ज असता तांत्रिक बिघाड झाला. यानंतर विमानतळावर बिकट परिस्थिती निर्माण झाली. विमानतळ कर्मचारी एसी वारंवार बंद करीत होते. परिणामी यात्रेकरूंना गुदमरल्यासारखे होत होते. खाद्य पदार्थ व राहण्याची अपुरी व्यवस्था असल्यामुळे यात्रेकरूंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तीन यात्रेकरू बेशुद्ध पडले. त्यांना खासगी रुग्णालयात भरती करावे लागले. गैरसोयीमुळे यात्रेकरूंनी प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या. सकाळी ६ वाजताचे विमान १०.२५ वाजता रवाना झाले होते. या घटनेला २५ सप्टेंबर रोजीच्या अंकात शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी व्यापक प्रसिद्धी दिली होती.(प्रतिनिधी)
हज यात्रेकरूंच्या गैरसोयीची हायकोर्टाकडून दखल
By admin | Published: September 27, 2014 2:41 AM