नागपूर : दिवसभरात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत अर्धे ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण बरे झाले आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. दुसरीकडे कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ३,६९७ नव्या रुग्णांची भर पडली, तर २९ रुग्णांचे बळी गेले. १,५९४ रुग्ण बरे झाले. रुग्णांची एकूण संख्या १,८९,४६६ झाली असून मृतांची संख्या ४,५९२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, सक्रिय रुग्णांच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सध्याच्या स्थितीत २७,६२५ कोरोनाचे रुग्ण आहेत. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी संख्या आहे.
नागपूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाच्या चाचण्याने उच्चांक गाठला. तब्बल १६,३८७ चाचण्या झाल्या. यात १२,१५६ आरटीपीसीआर, तर ४२३१ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,५५१, तर अँटिजेनमधून १४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात बरे होण्याचा दर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ९४ टक्क्यांवर होता. आता तो ११ टक्क्याने कमी होऊन ८३ टक्क्यांवर आला आहे. १८ सप्टेंबर रोजी ३,४२० रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. यावर्षी पहिल्यांदाच शनिवारी सार्वधिक रुग्ण बरे झाले. यात शहरातील १,३७२, तर ग्रामीण भागातील २२२ रुग्ण आहेत. आतापर्यंत शहरातील १,२६,९०५, तर ग्रामीणमधील ३०,३४४ असे एकूण १,५७,२४९ रुग्ण बरे झाले आहेत.
- शहरात २,८२६, तर ग्रामीणमध्ये ८५० रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २,८२६, तर ग्रामीण भागातील ८५० रुग्णांचा समावेश आहे. शहर आणि ग्रामीणमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मृतांमध्ये शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ९ मृत्यू आहेत. शहरात एकूण बाधितांची संख्या १,५१,१०२, तर मृतांची २,९४८ झाली आहे. ग्रामीणमध्ये ३७,३६८ रुग्ण आढळून आले असून ८३० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्हाबाहेरील ३ रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली.
-मेयोमध्ये ४००, मेडिकलमध्ये ३७४ रुग्ण
मेयोमध्ये कोरोनाबाधितांसाठी ६०० खाटांची सोय करण्यात आली असली तरी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने त्यांना अडचणीचे जात आहे. शनिवारी रुग्णालयात ४०० रुग्ण भरती होते, तर मेडिकलमध्ये ३७४ रुग्ण होते. एम्समध्ये खाटा फुल्ल होऊन आठवड्याचा कालावधी होत आहे. येथे ६१ रुग्ण भरती आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ७०, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १४, व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये ५२, तर पाचपावली कोविड केअर सेंटरमध्ये १५१ रुग्ण आहेत. १,१२२ रुग्ण शासकीयमध्ये आहेत, तर ६०११ रुग्ण खासगीमध्ये आहेत. २०,४९२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
::कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १६,३८७
ए. बाधित रुग्ण :१,८९,४६६
सक्रिय रुग्ण :२७,६२५
बरे झालेले रुग्ण :१,५७,२४९
ए. मृत्यू : ४५९२