नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत शनिवारी अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातही हजेरी लावली. जाेराचे वादळ आणि अनेक भागात गारपीटीसह अर्धा तास झालेल्या या पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. कळमना धान्य बाजारात उघड्यावर असलेले धान्य भिजले माेठी नासधुस झाली. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडले. दुसरीकडे जिल्ह्यात पारडी, कळमेश्वरसह काही तालुकत्यात गारपीटीमुळे नुकसान झाले.
शहरात शनिवारी सकाळपासून आकाश अंशत: ढगाळलेले हाेते. मात्र दुपारी ३ नंतर ढगांचे आच्छादन आणखी गडद हाेत वातावरण अचानक बदलले. दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान जाेराच्या वादळासह पावसाने हजेरी लावली. पावसासाेबत गाराही पडल्या. वादळ वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. सखल भागातील वस्त्या जलमय झाल्याचे चित्र हाेते व अनेकांच्या घरातही पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागले. सर्वाधिक नुकसान कळमन्यातील धान्य बाजारात झाले. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला असताना बाजारातील धान्य शेडबाहेर ठेवलेले हाेते. अचानक पाऊस झाल्याने सांभाळणे कठीण झाले. शेडबाहेर ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची अक्षरश: धुळधान झाली.
शहरात काही ठिकाणी गारपीट झाले, तसे जिल्ह्यातही काही तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती आहे. पारडी व कळमेश्वर परिसरात बाेराच्या आकाराच्या गारा पडल्या. पारडी (देशमुख), सवंद्री सुसुंद्री,उबगी, कळमेश्वर, झुनकी,चाकडोह, सावळी (खुर्द), वाढोणा (खुर्द), वरोडा, सावळी (बु), खैरी (लखमा) आदी गावांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान संत्रा पिकांचे झाले असून कापणी अभावी उभा असलेला गहु, हरभरा तसेच भाजीपाला आदी पिकांनाही फटका बसला आहे.
दुसरीकडे कोराडी, बोखारा, महादूला लोनखैरी, खापा बाबुलखेडा , घोगली या परिसरात वादळासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात फूलकोबी,पत्ताकोबी सांभार, गहू, पालक ,मेथी आदी भाजीपाल्यांची पिके मोठ्या प्रमाणात उभी आहेत. आज अचानक झालेल्या पावसाने या पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.