लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास जोराचा पाऊस झाल्याने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अर्ध्या तासाच्या पावसाने जागोजागी पाणी तुंबले. साचलेले पाणी काढण्यासाठी मनपाच्या अग्निशमन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अर्ध्या तासाच्या पावसामुळे अशी अवस्था झाली तर मुसळधार पाऊस झाल्यास काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसात बघायला मिळाले.नंदनवन कॉलनी, राजेंद्रनगर चौक, दर्शन कॉलनी, बालाजीनगर, शास्त्रीनगर, हिवरी ले -आऊट आदी वस्त्यात पाणी साचले होते. सिमेंट रोडचे अर्धवट काम असलेल्या अयोध्यानगर येथील गजानन शाळेजवळ पाणी तुंबले होते. एलआयसी चौक, भांडे प्लॉट, सदर कॉलनी, चिटणवीसनगर, टेलिकॉमनगर, मेडिकल चौक, शंकरनगर चौक, जगनाडे चौक यांसह शहरातील अनेक वस्त्या, रस्ते व चौकात पाणी साचले होते. जरीपटका, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर पाणी तुंबले होते. सदर येथील कॉफी हाऊस व दूध डेअरीजवळ झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेले पाणी कमी झाले. मनपा प्रशासनाने शहरातील पावसाळी नाल्या, गडरलाईन व त्यातील नाले स्वच्छ केल्याचा दावा केला आहे. परंतु दोन दिवसाच्या पावसात पावसाळी नाल्या स्वच्छ झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नाल्याच्या पुराचे पाणी तुंबल्याने राजेंद्रनगर, नंदनवन परिसरात पाणी साचले होते. पावसाचा जोर कमी झाल्यावर साचलेले पाणी निघून गेले. काही ठिकाणी पावसाळी नाल्यात कचरा व गाळ साचून असल्याने तर कुठे सिमेंट रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले.१४.२ मिमी पावसाची नोंदसलग दुसऱ्या दिवशी उपराजधानीत मान्सून जोरदार बरसला. दुपारी पाऊण तासात पावसाचा जोर जास्त होता. रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात १४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय आर्द्रतेतदेखील वाढ झाली. सकाळी ८.३० वाजता ९५ टक्के तर सायंकाळी ९६ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. बंगालच्या उपसागरात कमी दबावाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर विदर्भासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान, शहरात रविवारच्या तुलनेत जास्त थंडावा होता. कमाल तापमानात २.८ अंश सेल्सिअसची घट झाली व ३२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके होते.
अर्ध्या तासाच्या पावसाने नागपूरला धुतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:05 PM