लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - गॅस्ट्रो व इतर आजारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बहुसंख्य वॉर्ड फुल्ल असताना अनेक विभाग प्रमुख व वरिष्ठ डॉक्टर उन्हाळी सुट्यांवर गेले आहेत. रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी मेयो, मेडिकलच्या काहीच डॉक्टरांवर आल्याने उपचार मिळण्यास उशीर होत असल्याची रुग्णांकडून ओरड होत आहे.वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर घडवणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांना विद्यापीठातर्फे उन्हाळी आणि हिवाळी रजा मंजूर असतात. मात्र रु ग्णसेवा वाऱ्यावर पडू नये, यासाठी दोन भागात या रजा विभागून दिल्या जातात. सध्या उन्हाळी सुट्या १७ एप्रिल ते ७ मे आणि ८ मे ते २९ जून या कालावधीत विभागण्यात आल्या आहेत. परंतु, दोन्ही अधिष्ठात्यांनी सुटीवर जाणाऱ्या डॉक्टरांची रु ग्णसेवेसाठी उर्वरित डॉक्टरांचा दिवस व वेळेनुसार सोय करूनच सुटी मंजूर केली आहे. मात्र, उन्हाळ्यातील वाढते आजार, घटना, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गर्दी त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्याने उपचार मिळण्यास उशीर होत असल्याचे चित्र आहे. दर दिवसाला मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात सुमारे अडीच हजार रु ग्णांची तर मेडिकलमध्ये तीन हजारावर रुग्णांची नोंद होते. परंतु, डॉक्टर सुटीवर गेल्यामुळे रु ग्णांना तपासण्यासाठी लवकर डॉक्टरच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आहेत. मेडिकलमध्ये सुमारे १३५ च्या आसपास वैद्यकीय शिक्षक व डॉक्टर आहेत. यातील पन्नास टक्के वैद्यकीय शिक्षक, डॉक्टर रजेवर गेल्याची माहिती आहे. अर्धेअधिक डॉक्टर सुटीवर गेल्यामुळे निवासी डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णसेवेचा भार आला आहे.सुट्यांना घेऊन डॉक्टरांमध्ये नाराजीसाधारण उन्हाळी सुट्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासून सुरू होतात. परंतु यावर्षी तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झाल्या आहेत. उन्हाचा जोर जूनपर्यंत राहत असल्याने सुट्या एप्रिलच्या शेवट्या आठवड्यांपासून किंवा मेपासून सुरू करण्याची अनेक डॉक्टरांची मागणी होती, काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागालाही पाठविला. त्यांना परवानगीही मिळाल्याचे समजते. परंतु नागपूर मेडिकलने १७ एप्रिलपासून सुट्या जाहीर केल्याने मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.