रोज एक हजार पिशव्यांची गरज : उपलब्धता ५०० ते ७०० पिशव्यांचीचनागपूर : २५ लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानी नागपुरात रक्तदानाच्या संख्येचा आढावा घेतला असता केवळ अर्धा टक्काच रक्तदान होत असल्याची माहिती आहे. नागपुरात मेडिकल हब तयार होत असताना रक्ताची मागणीही झपाट्याने वाढली आहे. परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. केवळ नागपुरातच नव्हे तर देशातही एक टक्कासुद्धा रक्तदानाचे प्रमाण नसल्याची माहिती असून ही परिस्थिती बदलविण्यासाठी रक्तदानाबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे.उपराजधानीत अनेक मोठी रुग्णालये आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा यात समावेश असून विदर्भासह शेजारच्या राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण नागपुरात येतात. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. परंतु रक्तदानाचे प्रमाण कमी आणि मागणीचे प्रमाण दिवसेंदिवस जास्त होत असल्यामुळे रुग्णांना रक्त मिळणे कठीण होत आहे. शहरात दिवसाकाठी १ हजार रक्त पिशव्यांची गरज असताना जवळपास ५०० ते ७०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध होत असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. हरीश वरभे यांनी दिली. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात सर्वाधिक तुटवडाउपराजधानीत सर्वात कडक ऊन पडत असल्यामुळे उन्हाळ््यात रक्तदानाचे प्रमाण अतिशय कमी होते. कडक उन्हामुळे रक्तदान करण्याची नागरिकांची मानसिकता राहत नाही. त्यामुळे या दिवसात रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. ही परिस्थिती बदलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रक्तदात्यांना आवाहन करण्याची गरज आहे.स्वातंत्र्य दिनीच रक्तदानअनेक रक्तदाते केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला रक्तदान करतात. देशप्रेमापोटी या दिवशी स्वत:हून जाऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. परंतु वर्षभर हे रक्तदाते रक्तदानासाठी पुढाकार घेत नसल्याची माहिती रक्तदान क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिली. त्यामुळे देशप्रेमाची ही भावना एका विशिष्ट दिवशीच मनात न ठेवता वर्षातून किमान चार वेळा रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदानासारखे पवित्र दान नाही ‘रक्तदान हे सर्व दानात आदर्श दान आहे. रक्तदानामुळे आपण आपल्यासारखा दुसरा जीव वाचवू शकतो. रक्तदानासाठी केवळ ५ ते १० मिनिटांचा वेळ लागतो. रक्तदान केल्यानंतर २४ तासात रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज आहे.’-डॉ. बाळकृष्ण महाजन, कर्मचारी मध्य रेल्वे नागपूर विभागइतरांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे ‘अनेकदा अपघातात गंभीर जखमी होऊन जास्त रक्तस्राव होऊन रुग्णांचा मृत्यू होतो. संबंधित रुग्णाला वेळीच रक्तपुरवठा केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविणे शक्य होते. त्यामुळे मी १९७० पासून नियमितपणे रक्तदान करीत आहे. अनेकदा वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करतो. यापुढेही हे सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल नागपूर विभागरक्तदान ही सामाजिक बांधिलकी‘समाजात वावरत असताना समाजाप्रति प्रत्येकाची बांधिलकी असते. रक्तदानाच्या माध्यमातून आपण ही सामाजिक बांधिलकी जोपासू शकतो. रक्तदान केल्यामुळे शरीराची काहीच हानी होत नसून कुठलीच समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे रक्तदानाविषयी गैरसमज बाळगणे चुकीचे आहे. रक्तदानामुळे इतरांचे प्राण वाचविणे शक्य होत असल्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. ’-डॉ. राजेश नाईक, रक्तदाता, नागपूर
अर्धा टक्काच नागपूरकर करतात रक्तदान
By admin | Published: October 01, 2015 3:23 AM