नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये हाेणारे घाेळ थांबता थांबत नाहीत. नवे प्रकरण कंप्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंगच्या अंतिम सेमिस्टरचे आहे. या अभ्यासक्रमाच्या ‘पॅटर्न रेकगनिशन’ या पेपरमध्ये विचारलेल्या ८० प्रश्नांपैकी तब्बल ४६ प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे यांना तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक ३, ५ए, ७, ८, ९ व १० हे अभ्यासक्रमाबाहेरचे हाेते. मिळालेल्या माहितीनुसार पॅटर्न रेकगनिशन हा पर्यायी विषय म्हणून समाविष्ट केला आहे. याच नावाचा विषय कंप्युटर टेक्नालाॅजी या शाखेत आहे. मात्र दाेन्ही शाखेचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे. परीक्षा घेणारे विद्यापीठ दाेन शाखेच्या एकाच नावाच्या विषयात अडकले. प्रश्नपत्रिका कंप्युटर टेक्नालाॅजी शाखेच्या विषयावर आधारित सेट करण्यात आली, ज्यामुळे कंप्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग शाखेचे विद्यार्थी गाेंधळल्याचे सांगितले जात आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी कुलगुरू यांना भेटून याबाबतची तक्रार सांगितली. निवेदन परीक्षा विभागालाही सादर केले. याशिवाय काॅलेजच्या प्राचार्यांनीही विद्यापीठाला पत्र दिले पण अद्याप या गाेंधळाबाबत निर्णय घेण्यात आला नाही.
प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना नाेकरीची चिंता
बहुतेक विद्यार्थी हे अंतिम सेमिस्टरचे आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांच्या विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट झाल्या आहेत. झालेल्या गाेंधळामुळे अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना नाेकऱ्या गमवाव्या लागण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने कारवाई करून विद्यार्थ्यांची चिंता दूर करण्याची मागणी केली जात आहे.