नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता नामांकित शिक्षण योजनेंतर्गत वर्ग पहिली व दुसरीकरिता जानेवारी २०२२ मध्ये जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागितले होते. अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या ९ प्रकल्पांतून पहिलीचे ५५३ व दुसरीचे ३९० विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले; पण ऑगस्ट महिना संपत आला असतानाही या विद्यार्थ्यांचे अजूनही प्रवेश झालेले नाही. आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप समाजातून होत आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, नामांकित शाळा निवड करण्याबाबत गठित समितीची सभा २७ जुलै २०२२ रोजी मंत्रालयात पार पडली. बैठकीत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे योग्य होणार नाही. औपचारिक शिक्षण पहिलीपासून सुरू होत असल्याने २०२२-२३ पासून नामांकित शाळेत केवळ पहिलीपासूनच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला; पण हा निर्णय अजूनही स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. पालक अजूनही विद्यार्थ्यांचे नामांकित शाळेत प्रवेश होईल, याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, विभागाने जाहिरात काढून पहिली व दुसरीसाठी अर्ज मागितले आणि आता दुसऱ्या वर्गाला डावलले आहे; पण पहिल्या वर्गाचेही प्रवेश अद्यापही झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार विभागाने अजूनही नामांकित शाळेची निवडच केलेली नाही.
२५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित योजनेत शिक्षण देण्याचे टार्गेट
ही योजना सुरू झाली तेव्हा पाचवीपासून मुलांना योजनेत सहभागी करून घेण्यात येत होते; पण फडणवीस सरकारच्या काळात या योजनेत २५ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे यासाठी टार्गेट ठेवण्यात आले होते. त्यामुळे पहिलीपासूनच प्रवेश देण्यात येत होते. दोन वर्षे कोरोनामुळे योजना बंद होती. यंदा तर या योजनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
- शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी अर्ज मागवून दुसरीतील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यास सांगणे म्हणजे आदिवासी समाजाला मूर्खात काढण्यासारखा प्रकार आहे.
- दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद
प्रकल्पनिहाय प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी
प्रकल्प - पहिला वर्ग - दुसरा वर्ग
नागपूर - २१५ - १७५
देवरी - ११२ - ९८
वर्धा - १४ - १२
भंडारा - १५ - १४
गडचिरोली - ६६ - २७
चिमूर - २० - ३२
चंद्रपूर - १४ - १३
अहेरी - ६४ - ८
भामरागड - ३८ - ११