लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत मनपातील सुमारे ४० टक्के पदे रिक्त असून, सफाई कर्मचारी गृहित धरले तर ही संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे. नवीन पदांची भरती बंद आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच परत कामावर घेण्यात येत आहे.मनपामध्ये वर्ग १ ते वर्ग ४ मिळून ११ हजार ९६१ मंजूर पदे आहेत. यापैकी ७ हजार ९५० पदे भरली असून, तब्बल ४ हजार ११८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ३४.४३ इतकी आहे. वर्ग १ मधील २१४ पैकी १०३ पदे रिक्त आहेत, तर वर्ग २ ची ६१ पैकी ५० पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील ३ हजार ८१२ पैकी २ हजार १६ पदे रिक्त आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची ४ हजार ७२१ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे भरली जात नाही. यामुळे मनपात कंत्राट पद्धतीने कामे देण्याची प्रथा सुरू झालेली आहे. यामुळे अनियमितता झाल्यास जबाबदारी कुणावर निश्चित करणार, असा प्रश्न आहे. शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कंत्राटदाराला दिले होते. नियमानुसार सर्वेक्षण झाले नाही. मालमत्ताधारकांना माहिती नसताना फेरमूल्यांकन करण्यात आले. घरटॅक्स मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा टॅक्स वसुलीवर परिणाम झाला.सहा वर्षांत दोन हजार निवृत्त१ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत मनपातून दोन हजार कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाले, तर २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर त्यांच्या वारसदारांना अटी व शर्तींच्या अधीन राहून संधी देण्यात आली. परंतु सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांवर नवीन भरती झाली नाही. पुढील दोन-तीन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.कंत्राट पद्धतीत कमी वेतनकाही जागांवर तर परत सेवानिवृत्तांनाच कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्यात आले. यातील एकालाही ५० हजारांहून जास्त वेतन नाही. मनपाचा आस्थापना खर्च जास्त असल्याने ४५ टक्क्याहून अधिक आहे. तो ३५ टक्केपर्यंत येत नाही, तोपर्यंत नवीन नोकर भरती नाही. नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राट पद्धतीत कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिले जाते. परंतु जबाबदारी निश्चित नाही. अशा परिस्थितीत अनियमितता झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.अग्निशमनमध्ये ८० टक्के पदे रिक्तशहरातील ३० लाख लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा विभाग समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात ८०टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पुढील सहा महिन्यात सहा अधिकारी निवृत्त होत आहेत. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.