सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाला की, श्वास थांबेपर्यंत त्याचे आयुष्य दगडी भिंतीच्या आड जाते, असे बोलले जाते. परंतु आता बरे झालेल्यांना रुग्णालयाबाहेर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून ते सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगणार आहेत. आयुष्य जगण्याची आणखी एक संधी त्यांना मिळणार आहे.
मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची (हॉस्पिटलची) स्थापना केली. परंतु वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच त्यांच्या उर्वरित भविष्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. बरे झालेल्या रुग्णांच्या पुनवर्सनाच्या प्रश्नालाही कोणी गंभीरतेने घेत नव्हते. परिणामी, बरे होऊनही पुन्हा पुन्हा उपचाराची त्यांना गरज पडत होती. याची दखल घेत टाटा ट्रस्ट व नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने एक करार करीत रुग्णांच्या पुनर्वसनाची योजना तयार केली. यातूनच ‘हाफ वे होम’ संकल्पना पुढे आली. यात रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे, समाजाशी जुळवून घेण्याची सवय लावणे, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित करणे सोबतच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरूवात झाली. बरे झालेल्या २० रुग्णांना ‘हाफ वे होम’ सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयाबाहेर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम राबविणारा राज्यातील नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालय पहिले ठरणार आहे.
-सामाजिक संस्थेच्या मदतीने मिळणार रोजगार
‘हाफ वे होम’मध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाºयांना रुग्णालयाबाहेर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ने ‘मानव विकास’ या सामाजिक संस्थेशी करार केला आहे. ही संस्था शेतीच्या कामासोबतच झाडू तयार करणे, पत्रावळी व द्रोण तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, लिफाफे तयार करणे, खादी ग्रामोद्योगाशी संबंधित कामाचे प्रशिक्षण व रोजगार देणार आहे.
-पहिल्या पाच जणांना ‘व्हिजीटर्स’ कमिटीने दिली परवानगी
जिल्हा न्यायधीश, आरोग्य विभागाचे संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, खासगीमधील तीन मानसोपचार तज्ज्ञाचा सहभाग असलेल्या मनोरुग्णालयातील ‘व्हिजीटर्स कमिटी’ने ‘हाफ वे होम’मधून प्रशिक्षण प्राप्त २० पैकी पहिल्या टप्प्यात पाच जणांना रुग्णालयाबाहेर स्वयंरोजगारासाठी पाठविण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच ते आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
-शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा
उपचाराअंती बरे झालेल्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना वेग आला आहे. रुग्णालयाबाहेर त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’च्या मदतीने रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यासाठी २० जणांची निवड करण्यात आली असून यातील पाच जणांना ‘व्हिजीटर्स’ समितीने मंजुरी दिली आहे. आता शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येईल.
-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर