निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले. ते दोघेही तेथे राहू लागले होते. आता ती लवकरच अंडीही घालणार होती. तिची अवस्था पाहून तो तिला बाहेर जाऊ देत नसे. सकाळ झाली की तो बाहेर पडायचा. चोचीत इवलासा चारा आणून तो तिला भरवायचा आणि मग स्वत:ही घ्यायचा. येणाऱ्या नव्या पाहुण्यांचे स्वप्न ते दोघेही पाहत असावेत कदाचित. सर्व सुखात चालले होते. गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला भोवरी या पक्ष्याच्या नर-मादीचा संसार घरमालक आशिष महल्ले हे लक्षपूर्वक पाहत होते.पण शनिवारी अचानक अनपेक्षित घडले. नेहमीप्रमाणे तो सकाळी घरट्यातून निघाला. अन्नाचा शोध घेत तो परिसरातल्या विजेच्या उंच खांबावर बसला. त्याला फक्त घरट्यात वाट पाहणाऱ्या मादीसाठी अन्न गोळा करण्याची आस लागली होती. येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ होता. पंख उघडून तो झेप घेणार तसाच त्याचा पाय खांबावर लागलेल्या पतंगाच्या मांजात अडकला. सुटण्याची धडपड व पंखांची फडफडही व्यर्थ गेली. उलट या धडपडीत धाग्याने त्याचा पाय व पंख चिरला गेला. हे दृश्य पाहून आशिष यांनी लगेच महावितरणच्या कार्यालयात फोन केला. महावितरणचे पथक तेथे दाखल झाले. त्यांनीही संवेदनशीलता दाखवीत खांबावर चढून या पक्ष्याला जीवघेण्या मांजाच्या गुंत्यातून बाहेर काढले. तो गंभीर जखमी झाला होता. आसपासच्या संवेदनशील नागरिकांनी त्याला पाणीही पाजले व घराच्या गॅलरीजवळ ठेवले.या अपघातानंतर तो जखमांमुळे तडफडत होता, पण आपल्या मादीजवळ जाऊ शकत नव्हता. ती मात्र तो येण्याची सकाळपासून रात्रीपर्यंत घरट्यातच वाट पाहत होती. काहीतरी अघटित घडल्याची चाहूल तिला लागली असावी किंवा भूकही लागली असावी.म्हणूनच की काय ती या अवस्थेतही त्याच्या शोधात रविवारी घरट्याबाहेर पडली. त्यानंतर दिवसभर ती घरट्यात परतली नाही. तोही ठेवलेल्या जागेवर नव्हता. त्यामुळे ते पुन्हा घरट्यात परततील की नाही? की त्यांचा संसार अर्ध्यावरती मोडला तर नसेल ना, ही हुरहुर आसपासच्या लोकांना लागली आहे.
अर्ध्यावरती डाव मोडला...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:33 AM
गोपालनगरच्या त्या इमारतीच्या गॅलरीत एक सुबक घरटं बांधून त्यांनी आपला संसार थाटला होता. या छोट्याशा जागी घरटं बांधायला त्यांना त्रासही झाला होता. अनेक वेळा ते मोडलं आणि प्रत्येक वेळी काडी गोळा करून ते त्यांनी पुन्हा तयार केले.
ठळक मुद्देजखमी नर भोवरीला वाचविले ते दिसेनासे झाल्याने नागरिकांना हुरहूर