लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील गांधीबाग झोनअंतर्गत असलेला आलिशान बंगल्याला मनपातर्फे काही महिन्यांपूर्वीच नेस्तनाबूद करण्यात आले. त्याच बंगल्याच्या शेजारी त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५00 चौ.फूट क्षेत्रावरील चारमजली इमारतीचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अक्रिमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. पुढील चार ते पाच दिवस ही कारवाई चालणार आहे. आंबेकरची नागपूर शहरात एकच मालमत्ता नसून अनेक हडपलेल्या मालमत्ता आहेत. जुन्या बंगल्याशेजारीच त्याचे पुन्हा एक अनधिकृत चारमजली बांधकाम आहे, जे त्याची पत्नी नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे आहे. त्याचा घर क्रमांक ४८४ असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टीअंतर्गत येत असल्याने मनपाने ११ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र स्लम अॅक्टच्या कलम ३ झेड-१ अंतर्गत नेहा आंबेकर यांना नोटीस बजावली होती. सदर नोटिशीला नेहा आंबेकर यांनी मनपाच्या कार्यकारी अभियंता (स्लम) यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते. मालमत्तेसंदर्भात कुठलीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने सदर अपील फेटाळण्यात आली. त्यानंतर नेहा आंबेकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केले. मनपा आणि आंबेकर या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर नेहा आंबेकर यांचे अपील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी खारीज केले.
यापूर्वी तोडण्यात आलेल्या बंगल्यामधील सामान पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घरात ठेवले होते. घराला सील करण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अपील फेटाळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त राजमाने यांच्याशी संपर्क साधून या बंगल्यामधील संपूर्ण सामान काढण्याबाबत मनपाने सूचित केले. गुन्हे शाखेने तात्काळ तेथील सामान काढून घर तोडण्याच्या कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकाने सोमवारी सकाळी इमारत तोडण्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे सैय्यद साहिल या कुख्यात गुंडाचा बंगलासुद्धा काही दिवसांपूर्वीच मनपाने जमीनदोस्त केला होता. सदर कारवाई महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कनिष्ठ अभियंता बलेर्वार, मुख्यालयातील कांबळे यांनी केली. पोलिस विभागानेसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बंदोबस्त उपलब्ध करून देत या कारवाईत सहकार्य केले.२३१.७७ वर्ग मीटर अवैध बांधकामतळमजला जवळपास २३१.७७ वर्ग मीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेले चारमजली घर असून त्यावर मनपाचा हातोडा चालविण्यात आला. दाटीवाटीच्या क्षेत्रात हे घर असल्याने संपूर्ण घर तोडण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.