लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली.यात मौजा बिनाखी येथील नागोबा मंदिर, जामदारवाडी येथील पाच मंदिर, राधाकृष्ण मंदिर, प्रशांत सोसायटी प्रशांत सोसायटी येथील नागोबा मंदिर, खड्डा फॅक्ट्री जवळील माता मंदिर,अनिल ढेपे यांच्या घराजवळील महादेव मंदिर, तसेच नवीन मंगळवारी येथील श्री लक्ष्मी नारायण, शितला माता मंदिर, दुर्गा मंदिर आदींचा समावेश आहे.दोन टिप्पर आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने सकाळी ११ ते सायकांळी ६ वाजेपर्यंत एकूण सहा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. नासुप्रच्या उत्तर विभागातील कार्यकारी अभियंता आर. एन. मेघराजानी, विभागीय अधिकारी (उत्तर) अनिल एन राठोड, कनिष्ठ अभियंता सुधीर राठोड, हेमंत गाखरे, नरेंद्र दराडे, राजेश सोनटक्के व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.४३ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझरमहापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी जरीपटका भागातील एक बार, दोन खोल्यांसह ४३ अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालविला.जरीपटका येथील बबलू बारचे संचालक बलराम गेलानी यांनी १० बाय १० च्या दोन अनधिकृत खोल्यांचे बांधकाम केले होते. तसेच नरेश केशवानी यांनीही अनधिकृत बांधकाम केले होते. मंगळवारी झोनच्या पथकाने हे अतिक्रमण हटविले. तसेच जरीपटका चौक ते वसंत चौक मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील सहा शेड हटविण्यात आले. धंतोली झोनच्या पथकाने त्रिशरण चौक ते शताब्दीनगर चौक दरम्यानच्या मार्गावरील अतिक्रमण हटविले. बेलतरोडी मार्गावरील बालाजी ट्रेडर्स, साई हार्डवेअर दरम्यानच्या मार्गावरील २२ अनधिकृत शेड हटविण्यात आले. सोबतच ५५ अस्थायी अतिक्रमण हटविण्यात आले.नेहरूनगर झोनच्या तिसऱ्या पथकाने जगनाडे चौक ते केडीके कॉलेज व हसनबाग ते ईश्वरनगर चौक तसेच तथा गुरुदेव नगर चौक ते सक्कदरा चौकदरम्यान उभारण्यात आलेले अनधिकृत शेड तोडण्यात आले. या मार्गावरील २५ अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे करण्यात आली.