नागपूर : झिंगाबाई टाकळी व नारी भागातील अनधिकृत बांधकामावर गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या पथकाने हातोडा चालविला; सोबतच अतिक्रमण काढावे म्हणून तीन लाखांची रक्कम ठेव म्हणून घेण्यात आली. मौजा नारी येथील खसरा क्रमांक ८० येथील डीपीरोडसाठी आरक्षित असलेल्या प्लॉट क्रमांक ४० येथे बंधू गृहनिर्माण सहकारी संस्थेने केलेले दोन खोल्यांचे बांधकाम पथकाने तोडले. मौजा झिंगाबाई टाकळी येथील ओम आदर्श को-आॅपरेटिव्ह गृहनिर्माण सोसायटीच्या खसरा क्र. ६९/२ येथे अशफाक नामक बिल्डरने पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते. ते हटविण्यात आले. उर्वरित अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी त्यांच्याकडून तीन लाखांची ठेव घेण्यात आली. संपूर्ण अतिक्रमण हटविल्यानंतर ही रक्कम परत केली जाणार आहे.पथकाने बुधवारी सकाळी झिंगाबाई टाकळी येथून कारवाईला सुरुवात केली. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण हटविल्यानंतर नूर हार्डवेअर, ताहेरी मशिनरी आणि हार्डवेअरचे अतिक्रमण हटविण्यात आले. येथे पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. तसेच खसरा क्रमांक ५८/१ येथील प्लॉट क्रमांक ७२ येथे माजी सैनिकांची को-आॅपरेटिव्ह गृहनिर्माण सोसायटी आहे. येथे चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. कृष्णा गावंडे यांनी पार्किंगच्या जागेत फ्लॅटचे बांधकाम केले होते. पथकाने ते पाडले. खसरा क्र. ५९ येथील प्लॉट क्रमांक १२ येथील इरोज को-आॅपरेटिव्ह गृहनिर्माण सोसायटीत आशा श्रीवास यांनी तीन मजली इमारत उभारली आहे. त्यांनी पार्किंगच्या जागेत दोन खोल्या, चायनीज दुकान तसेच अन्य दोन दुकानांचे बांधकाम केले होते. पथकाने अनधिकृत बांधकाम हटविले. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामावर हातोडा
By admin | Published: January 21, 2016 2:43 AM