नागपूर : मजुराजवळ हँडग्रेनेड आढळल्यामुळे पोलिसांत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने हँडग्रेनेड निष्क्रिय करून सुटकेचा नि:श्वास सोडला.
वैशालीनगरमध्ये रस्त्याचे बांधकाम करताना एका मजुराला खोदकाम करताना हँडग्रेनेड मिळाला. त्याला लोखंडाची भारी वस्तू समजून मजुराने आपल्याजवळ ठेवले. काही दिवस हँडग्रेनेड घरात ठेवल्यानंतर त्याने तो भंगारवाल्याला विकण्याचे ठरविले. तो शनिवारी कपिलनगरच्या एका भंगार व्यावसायिकाकडे पोहोचला. त्याने भंगारवाल्याला हँडग्रेनेड दाखविला. तो पाहून भंगारवाला घाबरला. त्याने कपिलनगर पोलिसांना सूचना दिली.
पोलीस त्वरित भंगार व्यावसायिकाकडे पोहोचले. हँडग्रेनेड वैशालीनगरमध्ये मिळाल्यामुळे कपिलनगर पोलिसांनी पाचपावली पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने हँडग्रेनेड ताब्यात घेऊन तो वाडी येथील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्रात नेला. तेथे त्याला निष्क्रिय करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हँडग्रेनेड १० वर्षे जुना होता. त्याचा स्फोट होऊ शकला असता. कपिलनगर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.