योगेश पांडे - नागपूर: नागपूरला हादरविणाऱ्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात सुनेनंतर आता तिच्या भावाचा सहभागदेखील समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही ‘क्लास वन’ अधिकारी असून मृत भावाच्या पत्नीला संपत्ती मिळू नये यासाठी तिच्या वडिलांना म्हणजेच स्वत:च्या सासऱ्यांच्या हत्येची महिला अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाऊ ‘एमएसएमई’मध्ये संचालकपदावर आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांची सून व गडचिरोलीत नगर विकास सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिच्यासह घरातील चालक सार्थक बागडे, नीरज निमजे व सचिन धार्मिक यांना अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी कुणाकुणाला सुपारीची रक्कम वळती करण्यात आली व कुणाचा हात होता त्याचा शोध घेतला. त्यात अर्चनाचा भाऊ व एमएसएमई संचालक प्रशांत पार्लेवार व आर्किटेक्ट असलेल्या पायल नागेश्वरचे नाव समोर आले. पायल ही अर्चनाची सहायक होती व तिच्या माध्यमातूनच पैशांचा व्यवहार होत होता. तर प्रशांत पार्लेवारदेखील या कटात सहभागी असल्याचा दावा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केला. या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.केवळ पैशांसाठी शिजला कटअर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून आहे. पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचा अर्चनाचा भाऊ प्रवीणसोबत विवाह झाला होता. २००७ मध्ये प्रवीणचा मृत्यू झाला होता. पार्लेवार कुटुंबाची कोट्यवधींची संपत्ती आहे. उंटखान्यात त्यांची सहा हजार चौरस फूट जमीनदेखील आहे. त्या जमिनीवर योगिताने दावा केला होता. अर्चना व प्रशांत तेथे मॉल बनवू इच्छित होते. पतीच्या मृत्यूनंतर योगिताचे वडील पुरुषोत्तम तिच्यासोबत राहायचे. पार्लेवार कुटुंबात संपत्तीवरून न्यायालयात खटला सुरू आहे. योगिताकडून खटल्याचे पूर्ण काम पुरुषोत्तमच पाहायचे. जर पुरुषोत्तम यांचा काटा काढला तर योगिताचा वाटा आपण सहजपणे मिळवू शकू या विचारातून त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यात प्रशांत पार्लेवारने सार्थक बागडे, नीरज निमजे व सचिन धार्मिक यांची अर्चनासोबत ओळख करून दिली.मे महिन्यात दोनदा झाला जीव घेण्याचा प्रयत्नयाअगोदर पुरुषोत्तम यांना दोनदा मारण्याचा प्रयत्न झाला. ८ मे रोजी दुचाकीवरून जात त्यांना धडक देण्यात आली. मात्र अपघात समजून पुट्टेवार व त्यांचा मुलगा डॉ. मनीष यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर १६ मे रोजी रस्त्यावरून ते जात असताना लाकडी दांड्याने त्यांच्यावर प्रहार करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण ?२२ मे रोजी मानेवाडा रोडवर ८२ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारने चिरडून मृत्यू झाला होता. ही घटना अपघात मानून अजनी पोलिसांनी चालक नीरज निमजे याला जामीनही मंजूर केला होता. पुट्टेवार यांच्या भावाने तक्रार दिल्यानंतर नव्याने तपास करण्यात आला. यामध्ये पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार हिने तिच्या घरातील चालक सार्थक बागडे याच्यामार्फत नीरज निमजे व सचिन धार्मिक यांना सुपारी दिल्याची बाब उघड झाली. आरोपींनी कारने पुट्टेवार यांना उडविले होते व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न झाला होता.
पार्लेवारचा दावा, माझा सहभाग नाहीया प्रकरणावरून ‘लोकमत’ने प्रशांत पार्लेवारशी संपर्क साधला असता अगोदर उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अर्चना माझी बहीण आहे. मात्र या व्यतिरिक्त या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. पोलिसांनी मला केवळ चौकशीसाठी बोलविले होते, असे पार्लेवारने सांगितले.