लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो, तिला दोनदा रस्त्यावर सोडण्यात येते. मात्र, तरीही अत्याधुनिक सर्वेलन्स यंत्रणेला काहीच कळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. कामात हलगर्जी करणाऱ्या मूठभर पोलिसांमुळे महिला अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत, असा आरोप भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. शुक्रवारी त्यांनी सामूहिक बलात्कारपीडितेची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर, त्या पत्रपरिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.मोहन मते, डॉ.मिलिंद माने, राजेश हाथीबेड होते. संबंधित मुलीची बालसुधारगृहात भेट घेऊन त्यांनी धीर दिला. यानंतर, त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशीही चर्चा केली. संपूर्ण राज्यासाठी ही लाजीरवाणी बाब आहे. मुलीवरील अत्याचाराची घटना शुक्रवारी झाली आणि रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे दोन आरोपींना पळून गेले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचे कायदा व सुव्यवस्थेकडे लक्षच नाही, असे वाघ म्हणाल्या. माजी मंत्री संजय राठोड प्रकरणात फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अलीकडेच आला आहे. या प्रकरणातील संवाद हे जाहीर करण्यात यावे आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
महेश राऊतच्या आत्महत्येला जबाबदार पोलिसांना बडतर्फ करा
पोलिसांमुळे आत्महत्या केलेले महेश राऊत यांच्या कुटुंबीयांची चित्रा वाघ यांनी भेट घेऊन सांत्वन केले. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करायचा की नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. संबंधित प्रकरणाला जबाबदार असलेल्या पोलिसांना तातडीने पदावरून बरखास्त करावे, अशी मागणी वाघ यांनी केली.