नवी दिल्ली : राज्यातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागपूर, भंडारा जिल्ह्यातील हातमाग कारागूरांनी तयार केलेल्या टिशू, टसर, कोसा, सिल्क, कॉटनच्या साड्या, कापड, सलवार-कुर्ती, दुपट्ट्यांना ‘आदि’ महोत्सवात चांगलीच पसंती मिळत आहे.
येथील आयएनए परिसरातील दिल्ली हाटमध्ये केंद्रीय आदिवासी मंत्रालयांअतंर्गत येणाऱ्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघ (ट्रायफेड)च्यावतीने १ फेब्रुवारीपासून ‘आदि’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण ११ दालनांचा समावेश आहे. नागपुरातील परसराम औद्योगिक हातमाग विणकर सहकारी उद्योगाकडून टिशू-आणि टसर धाग्यांचा मिलाफ करून बनविलेल्या साडीला आदि महोत्सवात मागणी असल्याचे प्रवीण बडवे यांनी सांगितले. त्यांची तिसरी पिढी विणकामाचे काम करते. त्यांनी टिशू आणि टसरच्या धाग्यांपासून नवीन प्रकाराची साडी बनविली. ही साडी गोल्डन रंगाची दिसते. भंडारा जिल्ह्यातील ओरोमीरा महिला वन्य उद्योगाचे भोजराज सोनकुसरे, कोसा हॅन्डलूमचे राजू सोनकुसरे, ह्युमन रुरल डेव्हलपमेंट वेलफेअरचे नारायण बारापात्रे यांची कपड्यांची दालने आहेत. यामध्ये करावती काठी, कोसा, टसर, बाटीक, नागपुरी कॉटन, सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कापड, सलवार-कुर्ते, दुपट्टे आदी आहेत. गोंदियातील सालेकसा येथील आदिवासी स्वयं कला संस्थानच्यावतीने येथे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. आदि महोत्सवात दरवर्षी येत असल्याचे संस्थेचे मुन्नालाल ऊईके यांनी सांगितले.