लोकमतच्या आवाहनाला नागपूरकरांची साथ : कुणी दिले पैसे तर कुणी रेशनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नारा रोडवरील कृष्णानगर येथे आपल्या आईसोबत भाड्याने राहणाऱ्या लंकेश पांडुरंग बंदराखे यांच्या घराला आग लागल्याने सर्वच नष्ट झाले होते. घर सावरण्यासाठी लंकेशने प्रभाग १ मधील भाजपा नगरसेवकांचे उंबरठे झिजविले; परंतु त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. लोकमतने गुरुवारच्या अंकात लंकेशची व्यथा मांडत त्याच्या मदतीसाठी समाजाला आवाहन केले. लोकमतच्या आवाहनाला नागपूरकरांनी प्रतिसाद देत त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले. सकाळपासून लंकेशला शंभरावर लोकांनी फोन केले. त्याला मदत करण्याची इच्छा दर्शविली. काहींनी मदतीचे आश्वासनही दिले. उत्तर नागपूर विकास परिषदेचे वेदप्रकाश आर्य यांच्यासह फिलिप्स जैस्वाल, शालिनी धोटे, सूरज आवळे, विनोद सोनकर, रितेश बोरकर, अशोक पाराशर, अनिल बिंझाडे, बॉबी दहिवले, दिलीप जैस्वाल, मनोज शाहू, आशा दास, पराग नाईक आदींनी लंकेशच्या घरी भेट देऊन त्याला आर्थिक मदतीसह अन्नधान्य पुरविले. त्याला कपडे उपलब्ध करून दिले. मान सरोवर टॅरेस, न्यू कॉलनी, गोंडवाना चौक यांच्याकडूनसुद्धा लंकेशला आर्थिक मदत करण्यात आली. काही लोकांनी फोन करून लंकेशला मदत घेण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र, लंकेशची आई आजारी असल्यामुळे त्याने मदत घेण्यासाठी धावत जाण्यापेक्षा आजारी आईजवळ राहण्याचे कर्तव्य पार पाडले. हे पाहून आता ही मंडळी स्वत: लंकेशच्या घरी जावून मदत करणार आहे. ‘त्या’ भाजप नगरसेवकांनी मात्र अद्याप मदत केलेली नाही, हे विशेष.लोकमतचे आभारआगीमुळे घराची राख रांगोळी झाली. मदतीसाठी वणवण भटकलो, पण मदत मिळाली नाही. शेवटी लोकमतने माझी व्यथा मांडली. लोक मदतीसाठी धावून आले. मला माझे घर सावरण्यास मदत झाली. मी हे विसरू शकत नाही. लोकमतचे मनापासून आभार. - लंकेश बंदराखेमदतीसाठी आमदार मानेंचा पुढाकारलंकेशची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर आमदार डॉ. मिलिंद माने यांनी लंकेशला घरी बोलावून घेतले. त्याला आर्थिक मदत केली. माने यांच्या पत्नीने लंकेशच्या आईसाठी साडी, चोळी, शाल सोबतच उदरनिर्वाहासाठी साहित्य उपलब्ध करून दिले. माने यांनी तलाठी व तहसीलदार यांना स्वत: फोन करून पंचनामा करण्याची व लंकेशला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ मदत मिळवून देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना केली.
लंकेशच्या मदतीसाठी सरसावले हात
By admin | Published: June 09, 2017 2:39 AM