नागपुरातील ४० टक्के दुकाने बंद होणार : अद्याप नोटिसा नाहीत नागपूर : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दारू विक्री बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपुरात ४० टक्के दारूच्या दुकानांवर टांगती तलवार आहे. उत्पादन शुल्क विभागाने महामार्गावरील दुकानांना अद्याप बंदच्या नोटिसा दिल्या नाहीत, पण नूतनीकरणाअभावी ३१ मार्चनंतर महामार्गावरील दारूच्या दुकानाचे शटर उघडणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकानेसुद्धा बंद करावी, असे आदेशात म्हटले आहे. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी राजकीय आणि शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. शहरातील महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित केल्यास शहरातील दारूची दुकाने ‘जैसे थे’ राहतील. पण ही शक्यताही दुरावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपुरातील १२०० पेक्षा जास्त दुकानांचे शटर बंद होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी) अद्याप नूतनीकरण नाही राज्य उत्पादन शुल्क विभागाची नूतनीकरणाची प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होते. ३१ मार्च २०१७ ही अखेरची तारीख आहे. पण अद्याप काहीच हालचाली नाहीत. सर्वच दुकानदारांनी आवेदन शुल्कासह २५ रुपयांचे आॅनलाईन चालान भरले आहे. यामुळे आपले दुकान सुरक्षित राहील, अशी शक्यता दुकानदारांमध्ये आहे. पण ती प्रत्यक्षात येणार वा नाही, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. अन्य राज्याचा विचार केल्यास दुकाने बंद करण्यासाठी आयुक्त आणि विभागीय स्तरावर दारुच्या दुकानांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दारू विक्रेत्यांना अद्याप नोटिसा नाहीत राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील बार आणि दारुची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. वरिष्ठांचे आदेश न आल्यामुळे बार आणि दुकाने बंद करण्यासाठी अद्याप नोटिसा दिलेल्या नाहीत. - स्वाती काकडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.
दारू दुकानांवर टांगती तलवार
By admin | Published: March 09, 2017 2:18 AM