नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ५२ निरपराध्यांना मृत्यूच्या खाईत लोटणारा गुजरात रिव्हेंज फोर्सचा प्रमुख तसेच लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम (वय ५६) याचा शनिवारी रात्री येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावून नऊ वर्षे झालीत. मात्र, फाशीच्या शिक्षेची सुनावणी झालेली नव्हती. शनिवारी (९ फेब्रुवारी) रात्री अखेर काळानेच त्याच्यावर झडप घातली. त्याचा नैसर्गिक निकाल लागला. मात्र, त्याच्या मृत्यूने २५ आॅगस्ट २००३ मध्ये झालेल्या गेट वे आॅफ इंडिया तसेच झवेरी बाजारातील भयावह बॉम्बस्फोटाच्या थरारक आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. गुजरातमध्ये घडलेल्या काही घटनांचा सूड निरपराध नागरिकांवर उगविण्यासाठी २००३ मध्ये हनिफने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीवरून गुजरात रिव्हेंज फोर्स नामक ग्रूप तयार केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून देशातच नव्हे तर विदेशातही दहशत पसरवायची, असा कट गुजरात रिव्हेंज फोर्स संचलित करणाऱ्या हनिफ आणि फहमिदा या दाम्पत्याने रचला होता. त्यासाठी हनिफ आणि त्याच्या पत्नीने नासिर आणि अशरत या दोघांची मदत घेतली होती. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने जिलेटिन तसेच डिटोनेटरच्या माध्यमातून शक्तिशाली बॉम्ब कसे बनवायचे, त्याचे प्रशिक्षण लष्करच्या दहशतवाद्यांकडून घेतले होते. सर्व तयारी केल्यानंतर २४ आॅगस्टला फहमिदा, हनिफ आणि अशरतने बॉम्बस्फोट घडविण्यासाठी दिवसभर मुंबईतील विविध जागांची पाहणी केली होती. २५ आॅगस्टला कुणाला शंका येऊ नये म्हणून फहमिदा तसेच हनिफने आपल्या मुलींना सोबत घेऊन घर सोडले होते. हनिफने शिव पांडे नामक चालकाची कॅब (टॅक्सी) केली होती तर अशरतने लाला सिंहची कॅब १ हजार रुपयात भाड्याने घेतली होती. हनीफ पांडेची कॅब घेऊन गेट वे आॅफ इंडियाला पोहचला तर अशरत लाला सिंगची टॅक्सी घेऊन झवेरी बाजारात पोहचला. या दोघांजवळ शक्तिशाली बॉम्ब होते आणि त्यांनी स्फोटाची वेळही टायमरमध्ये फिक्स केली होती. १२. ४० वाजता झवेरी बाजारात टॅक्सी पार्क करून अशरत टॅक्सी बाहेर पडला. तर, हनिफने पांडेला ताजमहल हॉटेलसमोर टॅक्सी पार्क करण्याची सूचना करून फहमिदा तसेच दोन मुलीसह बाहेर निघाला. झवेरीत झालेल्या भयावह स्फोटात ३६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १३८ जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाने परिसरातील कोट्यवधींचे नुकसान केले होते तर, गेट वे जवळ घडवून आणलेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू तर ३६ लोकांना गंभीर दुखापत झाली होती.
धूर्तपणाला पोलिसांची चपराकघरी परतल्यानंतर हनिफ आणि फहमिदा काहीच केले नाही या अविर्भावात वागत होते. त्यांनी किराणा व अन्य चिजवस्तू खरेदी केल्या. जेवण तयार केले त्यानंतर जेवण घेतले आणि गुजरात रिव्हेंज फोर्सने घडविलेल्या दोन शक्तिशाली स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला, हे बघण्यासाठी हे सर्व टीव्हीसमोर एकत्र झाले. दरम्यान, त्यांनी शेजाºयांसमोर आपण किती भाग्यशाली आहो, घटनास्थळावरून काही वेळेपूर्वीच कसे निघालो, ते सांगितले. शेजाऱ्यांकडे हनिफ आणि त्याची पत्नी वारंवार किती जणांचा मृत्यू झाला, कितीचे नुकसान झाले, त्यासंबंधीची माहिती विचारत होते. तीच त्यांच्यासाठी घातक ठरली अन् पोलीस हनिफच्या घरी पोहचले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या थरारक हत्याकांडाची कबुली देत या दोघांनी साथीदारांची नावे आणि स्फोटाच्या कटाची पार्श्वभूमीही सांगितली होती. पोलिसांनी हनिफ, फहमिदा, अशरतसह अन्य काहींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे सादर केल्याने कोर्टाने या तिघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. प्रारंभी हे दाम्पत्य पुण्याच्या येरवडा कारागृहात होते. १८ आॅक्टोबर २०१२ ला त्यांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. हे दोघेही फाशी यार्डमध्ये वेगवेगळ्या बराकीत राहत होते. अखेर हनिफला फाशीची शिक्षा सुनावून ९ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर निसर्गानेच त्याचा हिशेब केला.हनिफचा कट अन पांडेचे नशिबस्फोटापूर्वी हनिफ त्याची पत्नी आणि मुलींना घेऊन टॅक्सीबाहेर आला आणि त्याने पांडेंना येथेच रहा, परत येतो असे म्हणत सरळ बसथांबा गाठला होता. तेथून बसमध्ये बसून तो आपल्या परिवारासह घरी पोहचला. बराच वेळ होऊनही हनिफ तसेच त्याचा परिवार न आल्यामुळे पांडे नाश्ता करण्यासाठी टॅक्सीबाहेर आले. अन् त्यांच्या टॅक्सीत भयानक स्फोट झाला होता. हनिफने इतरांसोबत पांडेचा गेम करण्याचा कट पूर्णत्वाला नेण्यास कसलीही कसर सोडली नव्हती मात्र टॅक्सी ड्रायव्हर पांडेचे नशिब बलवत्तर निघाले अन् ते बचावले.