नागपूर : राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे आता सरकारकडून विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत. यातच १ ऑक्टोबरपासून राज्यातील जंगल सफारीदेखील पुन्हा सुरू होत आहे. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानेही कोअरमधील पर्यटनाची दारे उघडण्याची तयारी केली असल्याने पर्यटकांचीही बुकींगसाठी लगबग सुरू झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, लाट ओसरल्यानंतर नियम पुन्हा शिथील करण्यात आले आहेत. आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. नवेगावबांध-नागझिरी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या ५ दिवसांचे ७०-८० टक्के बुकिंग झालेले आहे. तर, पेंच व्याघ्र प्रकल्पात ऑफलाइन पद्धतीने १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रकल्पांच्या प्रवेशद्वारावर सफारीचे बुकींग करता येणार आहे.
पेंच , बोर अभयारण्य , उमरेड -पवनी- कऱ्हाडला याठिकाणी सर्वप्रथम जंगल सफारींना सुरुवात होईल. पावसाची परिस्थिती लक्षात घेता पेंच प्रकल्पातील चोरबाहूली, कोलितमारा, सिल्लारी, खुबाळा, खुर्सापार, सुरेवानी, पवनी पर्यटन गेट तर बोर प्रकल्पातील बोर आणि उमरेड-कऱ्हांडा-पवनी अभयारण्यातील कऱ्हांडला, गोठनगाव गेटवर १ ते १५ ऑक्टोरबर या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटन करता येणार आहे. तर, १६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येईल. सफारी दरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.