लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सलग उपस्थिती विवाहबाह्य संबंध उघड करू लागली आहे. रात्रंदिवस मोबाईल हातात दिसत असल्याने अनेक कुटुंबातील संशयकल्लोळही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, तक्रार केंद्रात कौटुंबिक तक्रारींची संख्या वाढली आहे. गेल्या दहा महिन्यात १,१५४ कौटुंबिक तक्रारी आल्या. त्यातील ९६२ तक्रारींचे निराकरण करून भराेसा सेलच्या पोलिसांनी संसाराची विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याची भूमिका वठविली आहे. अनेक प्रकरणात विवाहबाह्य संबंधही उघड झालेले आहेत. त्यामुळे अशी प्रकरणे हाताबाहेर जात आहेत. मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवर होणारी मैत्रीही अनेक सुखी संसारात आग लावत आहे.
तक्रारीचे स्वरूप
सतत मोबाईलवर बोलणे आणि चॅटिंग करणे.
लपूनछपून बाहेर जाण्याचा आरोप. तो तिला, तर ती त्याला भेटत असावी, असा संशय.
सासर आणि माहेरच्या मंडळींचा संसारात अवाजवी हस्तक्षेप.
लहानसहान कारणावरून मारहाण. सुनेकडून सासू-सासऱ्यांना मिळणारी तिटकाऱ्याची वागणूक.
कौटुंबिक वादाच्या तक्रारीत परस्परांविषयीचे गैरसमज आणि संशय वाढला आहे योग्य समुपदेशन होत असल्याने तुटू पाहणारे संसार जोडण्यात आम्हाला यश मिळते.
- उज्ज्वला मडावी
पोलीस उपनिरीक्षक,
भरोसा सेल, नागपूर.
आधीही वाद, कुरबुरी व्हायच्या. मात्र नंतर पती किंवा पत्नी कामाच्या निमित्ताने बाहेर निघून जात असल्याने वादाची तीव्रता कमी होती. लॉकडाऊनमुळे २४ तास पती-पत्नी समोरासमोर राहतात. त्यामुळे शब्दाने शब्द वाढत जातो आणि छोट्याशा वादाचा भडका उडतो. पती-पत्नी हिंसक होतात.
हे टाळण्यासाठी वाद सुरू होताच पती-पत्नीने समोरासमोर राहू नये. त्यांनी बाहेर जावे किंवा वेगवेगळ्या रूममध्ये जाऊन संगीत ऐकावे, वाचन करावे, टीव्हीसमोर बसावे. परत जेव्हा केव्हा समोर आले, तेव्हा जुना वाद उकरून काढू नये. दुसऱ्या चांगल्या विषयावर बोलावे. त्यामुळे संसाराची घडी नीट राखण्यास मदत होईल.
-- राजा आकाश.
समुपदेशक, नागपूर.
---