नागपूर : प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाल्यास त्याचा आम्हाला आनंदच हाेईल. याबाबत हायकमांड याेग्य ताे निर्णय घेईल, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नागपुरात स्पष्ट केले.
पटोले नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली. आठ वर्ष देश विकून देश चालविण्याचे काम केले. संविधानिक व्यवस्था संपविण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी यावर काहीच मार्ग काढला नाही, अशी टीका त्यांनी केली. धर्म हा आस्थेचा विषय आहे. आम्हीही घरी हनुमान चालिसा पठण करतो. आमचा धर्म आम्हाला हेच शिकवतो, असा चिमटा त्यांनी राणा दाम्पत्याला घेतला. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्याने होत आहे. मी आतापासून सांगतो की आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
भाडोत्री सोशल मीडियावर भाजपचा दररोजचा ४० कोटींचा खर्च
सोशल मीडियावर काँग्रेसची बदनामी करण्यासाठी, खोटा प्रचार करण्यासाठी भाजपने पेड यंत्रणा उभारली आहे. या भाडोत्री सोशल मीडियावर भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करते. ते काम काँग्रेस करणार नाही. वस्तुस्थिती समाजासमोर मांडणे ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे. सोशल मीडियावरील भाजपच्या भाडोत्री लोकांच्या विरोधात कसे टिकता येईल, याचे मार्गदर्शन काँग्रेसच्या सोशल मीडिया शिबिरात दिले जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.