नागपूर : घरातील सून ही लक्ष्मीचे रूप मानले जाते व तिला सासरच्यांनी सन्मान देणे अपेक्षित आहे. मात्र हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा इतका छळ केला की लक्ष्मीपूजनाच्या पुर्वसंध्येला घरातील त्या लक्ष्मीला स्वत:चा जीव द्यावा लागला. लग्नाच्या सहा महिन्यांतच तिला हे पाऊल उचलावे लागले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ह्रद्यद्रावक घटना घडली असून समाजात अद्यापही हुंड्याची कीड कायम असल्याची दुर्दैवी बाब परत एकदा समोर आली आहे.
रितू राहुल पटले (२६, प्रिती हाऊसिंग सोसायटी, ओमनगर) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. ती मुळची मध्यप्रदेश येथील बालाघाटची होती. तिचे वडील सेवकराम टेंभरे (५४) यांनी १० मे २०२३ रोजी तिचे लग्न राहुल पटले (३२) याच्यासोबत लावून दिले. मुलगी चांगल्या घरात गेल्याचे त्यांना समाधान होते. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी राहुल, त्याची आई रेखा राजेश पटले (५४), नणंद राणी रहांगडाले (३३), मिनू यांनी हुंड्यासाठी छळायला सुरुवात केली.
लग्नात तुला सहा तोळे व आमच्या मुलाला केवळ अडीच तोळे सोने दिले असे म्हणत लहानसहान गोष्टींवरून ते रितूला शिवीगाळ करून मारहाण करायला लागले. त्यानंतर त्याची तिच्याजवळून सोनेदेखील हिसकावून घेतले. तुझा येथे राहण्याचा हक्क नाही, येथे राहू नको असे म्हणत तिचा शारीरिक छळदेखील करायला लागले. रितूने कंटाळून तिच्या माहेरच्यांना या प्रकाराची माहिती दिली व ११ नोव्हेंबर रोजी सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या वडिलांना हा प्रकार कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.