लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक काळात मुला-मुलींसह महिलाही सोशल मीडियाचा वापर करतात. जवळपास सर्वच मुली-महिलांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर अकाऊंट असते. अनेकजण फेसबुकवर आपला फोटो, वैयक्तिक माहिती आणि मोबाईल क्रमांक अपलोड करतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि महिलांचा छळ करतात. त्यामुळे मुली आणि महिलाच काय पुरुषांनीही सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती टाकण्याचे टाळले पाहिजे, असा सल्ला सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
कुठल्या प्रकारचा होतो छळ
अ) नको त्या वेळी घाणेरडे मेसेज
ब) अश्लील व्हिडिओ पाठविणे
क) दुसऱ्याच्या नावाने सायबर गुन्हा घडवून आणणे
ड) महिलांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करणे
इ) महिलांचे अश्लील फोटो शेअर करणे
अशी घ्या काळजी
- युवती, महिलांनी सायबर साक्षरता वाढवावी. तंत्रज्ञान, इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापराविषयी ज्ञान, माहिती व जागरूकता वाढवावी. वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ, पॅनकार्ड नंबर, आधारकार्ड नंबर, अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम आणि इतर गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये किंवा सोशल मीडियावर अपडेट करू नये.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
-अनेकदा युवती, महिलांना अश्लील मॅसेज येतात. अश्लील व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतात. यात नातेवाईकही जवळच्या महिला, युवतींचे शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करतात. हे व्हिडिओ दाखवून त्यांचे वारंवार शोषण करतात. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक युवती, महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशा महिलांनी पुढे येऊन असे गुन्हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरूद्ध तक्रार करण्याची गरज आहे.
अनोळखी व्यक्तिंना प्रतिसाद देऊ नका
‘कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर खूप होत आहे. अनेक व्यक्ती फेक अकाऊंट तयार करून महिला, मुलींना रिक्वेस्ट पाठवितात. त्यांच्याशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करतात. महिला, मुलींनी ब्लॉक केल्यास त्यांचे विकृत फोटो तयार करून त्यांची बदनामी करतात. त्यामुळे महिला, मुलींनी अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये.’
-नूतन रेवतकर, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस, नागपूर शहर
महिलांनी वैयक्तिक माहिती देऊ नये
‘महिला, युवतींनी आपले सोशल मीडियावरील अकाऊंट लॉक करावे. आपली वैयक्तिक माहिती, फोटो टाकू नये. आपला छळ होऊ शकेल, अशा गोष्टी शेअर करू नयेत. महिलांचा छळ करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.’
-नीता ठाकरे, माजी सदस्य, राज्य महिला आयोग
अश्लील मेसेज, व्हिडिओ आल्यास करा तक्रार
‘अनेकदा महिलांना अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठविण्यात येतात. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक युवती, महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार त्यांचे शोषण करतात. त्यामुळे असा प्रकार घडल्यास युवती, महिलांनी सायबर सेलकडे तक्रार करणे गरजेचे आहे. तक्रार आल्यास अशा सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे शक्य होईल.’
-अशोक बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल
...येथे करा तक्रार
- नागपुरात सायबर सेलच्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी सायबर सेल अस्तित्त्वात आहे. सायबर पोलीस स्टेशन, चौथा माळा, प्रशासकीय इमारत क्रमांक १ येथे सायबर सेलच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार सादर करावी.
...........