मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय; अजित पवारांची मिश्कील टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:28 AM2022-12-29T10:28:30+5:302022-12-29T10:31:18+5:30
Winter Session Maharashtra 2022 : तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले.
नागपूर : राज्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असून सत्ताधारी-विरोधकांकडून विविध मुद्दयांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांचा वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना, हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय अशी मिश्कील टीका विधान सेभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.
'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. मी एकच दौरा केला तर माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली. 'अजितदादा कधी रडतात तर कधी ८-८ दिवस फोन बंद करून पळून जातात. दादांना नेहमी क्रिम पोस्ट मिळत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विरोधीपक्ष नेते हे योग्य नाही. त्यांच्या जागी जयंत पाटील याना संधी मिळयला हवी होती,' असा टोला त्यांनी लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली.
तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात, मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात, भ्रष्टाचार, महिला सुसक्षा या विषयांचा समाविष्ट असेल, असंही त्यांनी सांगितलं.
कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे
अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. कुठल्या कालावधीत त्यांनी भ्रष्टचार केला होता, उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क देणे गौण आहे. प्रकरण लक्षात आल्यानंतर विरोधकांचे कामच आहे सभागृहात उचलण्याचे, असे पवार म्हणाले.