लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेहनतीच्या कमाईतून खरेदी केलेली जमीन भूमाफियांनी बोगस दस्तावेज बनवून लाटली. कब्जा केला. पैसे भरूनही बिल्डर प्लॉटचा ताबा देत नाहीत. तसेच भाडेकरू-घरमालक यांच्याशी संबंधित वाद गृहमंत्र्यांच्या तक्रार निवारण शिबिरात गाजले.
सोमवारी ५० लोकांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी बोलावण्यात आले होते. यात लोकांनी सांगितले की, ते कशाप्रकारे भूमाफिया आणि शासकीय यंत्रणेने त्रस्त आहेत. कुंभारे नावाच्या एका तक्रारकर्त्याने एका नगरसेवकाचे नाव घेऊन सांगितले की, त्यांच्या मालकीच्या जागेवर अवैध कब्जा केला आहे. नगरसेवकाचे कुटुंबीय भूमाफिया आहेत. त्यांची यााअगोदर गठित केलेल्या एसआयटीमध्ये तक्रारसुद्धा करण्यात आली होती. परंतु एसआयटीने कुठलीही कारवाई केली नाही. नगरसेवक व त्याचे साथीदार जीवे मारण्याची धमकी देतात.
मंगला वाकोडे यांनी सांगितले की, त्यांच्या घराजवळ हॉटेलचे अवैध बांधकाम करण्यात आले आहे. ते तोडण्यासाठी नेते, पोलीस आणि मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु काहीही कारवाई झाली नाही. हॉटेलमुळे त्यांना मोठा त्रास होतो. नगरसेवक मनोज गावंडे यांनी अजनी परिसरात गुन्हेगारी वाढल्याची तक्रार केली. अजय दलाल आणि त्यांच्यासोबत असलेल्या नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांनी सांगितले की, पीडितांना ठाण्यातच गुन्हेगार धमकावतात. अजनी येथील रहिवासी रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने पतीकडून असलेल्या त्रासाची माहिती दिली. तिने सांगितले की, पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एमपीडीएची कारवाईसुद्धा करण्यात आली. पतीमुळे तिचा व तिच्या भावाचा जीव धोक्यात आला आहे.
कल्पना नंदनवारने पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार केली. तिने सांगितले की, पती सरकारी अधिकारी आहे. त्याने अवैध पद्धतीने मोठी संपत्ती जमविली आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी.
गृहमंत्र्यांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून घेत यासंदर्भात डीसीपी, मनपा अधिकारी व नासुप्र अधिकाऱ्यांना तातडीने योग्य कारवाई करून पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले. यावेळी पोलीस आयुक्तांसह शहरातील पोलीस आणि इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.