लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ ला झालेल्या यूपीएससी परीक्षेत नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेशी निगडित असलेल्या प्रज्ञा कैलास खंदारे यांनी ७१९ व्या रॅँकसह यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे २०१६ नंतर दुसऱ्यांदा त्यांनी यूपीएससीमध्ये यश संपादन केले आहे. सिव्हिल सर्व्हिसची देशातील ही उच्च दर्जाची परीक्षा आहे, मात्र परिश्रम करण्याची तयारी, त्यात सातत्य आणि संयम बाळगल्यास यश नक्की प्राप्त होते, अशी भावना प्रज्ञा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
प्रज्ञा या दिग्रस, यवतमाळ येथील आहेत. आईवडील दोघेही शिक्षक आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हे दिग्रस येथेच झाले. त्यानंतर शेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१२ साली त्यांनी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी प्राप्त केली. पुढे दोन वर्षे त्यांनी पुण्यात खासगी कंपनीत नोकरीही केली. त्यावेळी पहिल्यांदा यूपीएससीबाबतचा विचार त्यांच्या मनात आला. इंजिनिअरिंगची नोकरी एका क्षेत्रापुरती मर्यादित आहे पण सिव्हिल सर्व्हिसमध्ये थेट जनतेशी, त्यांच्या कामाशी जुळता येते, असे वाटले आणि नोकरी सोडून २०१४ पासून तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
२०१५ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ट्रेनिंगनंतर अकोला महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून पोस्टिंग मिळाली. पुढे दुसºयाच वर्षी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षाही यशस्वीपणे उत्तीर्ण केली. सध्या त्या इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिसअंर्गत नांदेड येथे सेवारत होत्या. यावर्षी पुन्हा त्यांनी अधिक रॅँकसह यश प्राप्त केले.यश प्राप्त करण्यासाठी यशदा व बार्टी या दोन संस्थांची मोठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक व मुख्य परीक्षेचे आव्हान पूर्ण केल्यानंतर मुलाखतीचा टप्पा अधिक कठीण असल्याचे बोलले जाते. मात्र मुलाखत कठीण नाही तर ती तुमची व्यक्तिमत्त्व चाचणी आहे. बोलण्यात आत्मविश्वास, सत्यता, निर्णय क्षमता, समयसूचकता व नेतृत्वक्षमता तपासली जात असल्याचे प्रज्ञा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांनी संयमाने सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.