नागपूर : जशी वाऱ्याची लय बदलत जावी आणि स्पर्शाची खुमखुमी वाढत जावी... तशाच स्वरांचा धनी म्हणून संगीत क्षेत्रात ओळखला जाणारा आवाज म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री हरिहरन यांचा. हरिहरन यांचा हाच क्लास संगीत रसिकांना भावतो आणि या क्लासमध्ये मास (गर्दी) कधी हरपून जातो, याचा अनुभव शनिवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात घेता आला. हरिहरन यांनी गायलेली गाणी प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव नागपूरकर रसिकांना घेता आला आणि सोबतीला सारेगमप लिटिल चॅम्प फेम मराठमोळी युवा गायिका आर्या आंबेकर होतीच. मग काय नागपूरकरांच्या मनोरंजनाला उधाण आले.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात शनिवारी हरिहरन यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट पार पडला. हरिहरन यांनी ‘विघ्नेश्वरा, लंबोधरा’ या गणेशस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि नागपूरकर रसिकांना ‘क्लास विथ मास’ अशा संगीत प्रवासावर घेऊन गेले. त्यांनी ‘रोजा’ चित्रपटातील ‘रोजा जानेमन तू दिल की धडकन’, ‘१९४७ अर्थ’मधील ‘भिनी भिनी खुशबू है तेरा बदन’ ही गाणी सादर केली. त्यानंतर आर्या आंबेकर सोबत चंद्राला साद घालत ‘चंदा रे चंदा रे कभी तो जमीं पर आ बैठेंगे बाते करेंगे’, ‘बाहों के दरमियाँ’ हे गाणे सादर केले आणि रसिकांमध्ये एकप्रकारची उत्कटता दाटून आली. ‘जोगवा’ चित्रपटातील ‘जीव दंगला गुंतला रंगला असा’ हे गाणे सादर करत मनातील उत्कटतेला मोकळे केले. आर्याने ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ हे एकल गीत सादर केले आणि त्यानंतर दोघांनीही सुरेल स्वरांची बरसात नागपूरकर रसिकांवर गेली. यावेळी हरिहरन यांचा मुलगा अक्षय यानेही काही गाणी सादर केली.
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरिहरन व आर्या आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. नागपूर हे माझे जन्मस्थळ असल्याचे आर्या यावेळी म्हणाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, ज्येष्ठ उद्योगपती रमेश मंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर सतीश मराठी, रेडिसल ब्लूचे मनोज बाली आदी उपस्थित होते.
‘तारे जमीं पर’ लघुनाट्याचे सादरीकरण
- हरिहरन यांच्या कार्यक्रमापूर्वी वंचित मुलांसाठी कार्य करणाऱ्या खुशाल व उषा ढाक या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ‘तारे जमीं पर’ हे लघुनाट्य सेवावस्तीतील मुलांनी सादर केले. सेवासर्वदा बहुउद्देशीय संस्थेचे संचालक व झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे खुशाल व उषा ढाक यांचा यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सुप्रसिद्ध गायक श्याम देशपांडे यांच्या नेतृत्वातील ५० महिलांच्या समूहाने ‘चंदन है इस देश की माटी, बच्चा बच्चा राम है’, ‘जय भारत वंदे मातरम’ ही देशभक्तीपर गीते सादर केली.
..........