‘जनसंवाद’साठी काँग्रेस नेत्यांमध्ये सुसंवाद; वर्धा जिल्ह्यातील शहीद स्मारकापासून होणार यात्रेची सुरुवात
By कमलेश वानखेडे | Published: August 22, 2023 05:00 PM2023-08-22T17:00:35+5:302023-08-22T17:02:40+5:30
नाना पटोलेंसह सर्वच नेत्यांची उपस्थिती
नागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान काढण्यात येणाऱ्या ‘जनसंवाद यात्रे’च्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मंगळवारी रवीभवन येथे पूर्व विदर्भातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जवळपास सर्वच नेते गट-तट विसरून उपस्थित होते व त्यांच्यात सुसंवाद दिसून आला. नेत्यांनी यात्रेबाबत आपापल्या सूचना मांडल्या. ३ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकापासून यात्रेची सुरुवात करण्याचा निर्णय घेत यात्रेचा पूर्व विदर्भातील मार्ग निश्चित करण्यात आला.
रविभवनातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनील केदार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. विकास ठाकरे, आ. अभिजत वंजारी, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. सहसराम कोरोटे, आ. रणजित कांबळे, अमर काळे, चारुलता टोकस, यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये, दिलीप बनसोड, महेंद्र ब्राम्हणवाडे, अशोक धवड, डॉ. नामदेव किरसान, नामदेव उसेंडी, मोहन पंचभाई, जिया पटेल, अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते.
असा आहे कार्यक्रम
- ३ सप्टेंबर : वर्धा
- ४, ५ सप्टेंबर : चंद्रपूर
- ६ सप्टेंबर : गडचिरोली
- ७,८ सप्टेंबर : नागपूर
- ९,१०,११, १२ सप्टेंबर : भंडारा, गोंदिया
जनसंवाद यात्रेची वैशिष्टे
- भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही पदयात्रा काढाली जाईल.
- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सहाही जिल्ह्यातील पदयात्रेत सहभागी होतील.
- स्थानिक पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येत विधानसभेत ही यात्रा फिरेल.
- यात्रेत पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांशी संवाद साधतील.
- प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात येणारे पत्रक घरोघरी पोहचविले जाईल.
- प्रत्येक जिल्ह्यातील समस्या वेववेगळ्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रक जिल्हा स्तरावरही काढले जाईल.