मनोहर मुरकुटे
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी सत्तर वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पानपिंपरी या वनौषधी पिकाची लागवड ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सध्या मिळत असलेल्या दरामुळे गेल्या सहा वर्षांपासून हे पीक मोडीत काढण्याची भूमिका घेतलेले शेतकरी आनंदित झाले आहेत. हा दर स्थिर राहिल्यास पानपिंपरी उत्पादकांच्या कष्टाचे चीज होईल, अशा प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी परिसरात उमटत आहेत.
आठ ते दहा वर्षांपासून पानपिंपरी पिकावर सतत निसर्गाचा कोप होत आहे. शासनाचे तुटपुंजे अनुदानही दोन वर्षांपासून बंद पडले. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. अशाही परिस्थितीत महागडे खर्चाचे पानपिंपरी हे वनौषधी पीक जिवंत ठेवण्याचे काम परिसरातील शेतकरी हे अविरत करीत आहेत. पाच, सहा वर्षांपासून या पिकाला ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु, उत्पादक कमी झाल्याने घटलेले पानपिंपरी उत्पादन व कोरोनाचा प्रभावामुळे पिकाला आयुर्वेदामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता, यावर्षी ५५० रुपये प्रतिकिलोवर दर पोहोचला. काही दिवसांत हाच दर ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे व राष्ट्रीय स्तरावरून वाढती मागणी पाहता, दरात तेजी राहणार असल्याचे व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांची चर्चा जोर धरत आहे.
कोरोनावर गुणकारी औषध म्हणून पानपिंपरी उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे पिकाच्या दरात तेजी राहणार, हे निश्चित आहे.
- संजय नाठे, पिपरी उत्पादक शेतकरी
आंतरराष्ट्रीय बाजारात पिकाची मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी चांगला भाव मिळत आहे. तो यापुढेदेखील वाढता राहील.
- संजय टिपरे, व्यापारी
पानपिंपरी पिकाचा उत्पादन खर्च ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दरात निघत नव्हता. अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे याच पिकाच्या भरवशावर शेतकरी होते. आताचा दर भविष्यात कायम राहिल्यास उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
- मनोहर मुरकुटे, शेतकरी