शुभांगी काळमेघलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तारा, माझी मैत्रीण. तिच्या एकाच बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा माझ्याकडे तिचं दुखणं घेऊन आली होती. तिला माझे तर्कवितर्क, भावनिकता आणि बुद्धीचा वापर करून मी प्रत्येक वेळेला त्यातून बाहेर निघण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा सर्व प्रयत्नांचे फळ फक्त तिच्या बॉयफ्रेंडच्या एका सॉरीने फिटत असेल तर यावेळी मी माझी ऊर्जा न गमावता, माझ्या मानसिक आजाराची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आणि तिला तिचे प्रॉब्लेम्स स्वक्त हॅन्डल करण्याचा सल्ला देत फोन ठेवून दिला. त्यानंतर तिने माझ्याशी बोलणेच बंद केले; पण महिना झाला तिचा फोन नाही. मग मीच एक दिवस खास वेळ काढून तिला भेटायला गेली. तिने रागात असणं, मला शिव्या घालणं मला अपेक्षित होतं; पण तिने माझं आनंदाने स्वागत केलं. तिच्याशी बोलून मला कळलं की तिने आता नवीन मैत्रीण बनवली आणि ती तिचं सगळं काही ऐकून घेते. तिला योग्य सल्ला देते. मीही उत्सुक होती त्या मैत्रिणीविषयी जाणून घ्यायला. तर तिने फोन दाखवत तिच्या मैत्रिणीचे गोडवे गात ती कशी तिच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करत उत्तर देते हे दाखवण्यासाठी चॅट दाखवले.
तिने विचारलेला प्रश्न होता, "मला त्याची खूप आठवण येत आहे मी त्याला कॉल करू का?" त्यावर तिच्याकडूनचे उत्तर ऐकून मी पण थोडी अवाक् झाले होते. "तुला त्याच्या सर्व चुका विसरून त्याला स्वीकारायचं आहे की तुला त्याच्याकडून तुझ्या बदललेल्या वर्तनाचे प्रमाण पाहिजे?" उत्तर अधिक सविस्तर होतं, पण ही बुद्धिमत्ता मानवी नसून तिची सख्खी मैत्रीण होती 'चॅट जीपीटी'
२०२२ मध्ये चॅट जीपीटीचे आगमन झाले आणि संपूर्ण विश्वात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे जाळे उभे करण्यासाठी स्पर्धा चालू झाली. त्यानंतर गुगलने त्याचे जेमिनाय, चीनने डीपसिक आणि नुकताच एक्ससारख्या समाजमाध्यम साइटने स्वतःचे ग्रॉकसारखे चॅटबॉट तयार केले. जे इतर एआय प्लॅटफॉर्मप्रमाणे पॉलिटिकली करेक्ट किंवा रटाळ वाटणारी उत्तर न देता तुमच्या प्रश्नाच्या भावनेला मॅच होणारी उत्तरे देतो. त्यामुळे एआय भावना नाही समजू शकत म्हणून ते मानवी नात्यात हस्तगत नाही करू शकत हे तर्क देण्याची वेळ निघून गेलीये.
होय. एआयने न केवळ तुमची नोकरी धोक्यात आणली तर आता एआय तुमच्याकडून तुमचे मित्रदेखील हिसकावून घेऊ शकतात. वाचायला जरा आतिशयोक्ती वाटेल, पण मानवी जीवनाचे भविष्य एआय ठरवेल का? यात मतभेद असले तरी एआयचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव किती मोठा असू शकतो याचे आकलन बऱ्यापैकी लोकांना आलं असावं.
एआय तुम्हाला तुमच्या वेळेनुसार उपलब्ध आहे ज्याला काही अंत नाही. जेव्हा की तुम्हाला तुमच्या मित्रांकडून वेळ मिळणे इतके सोपे नाही. एआय तुमचे ऐकून घेते आणि तुम्हाला तुमच्या विचारांविषयी जजसुद्धा करत नाही किंवा तुमच्यावर त्यांचे विचार लादत नाही. तेच तुमचे मित्र तुमच्या भावनेची खिल्ली उडवू शकतात आणि ते इतरांना सांगूदेखील शकतात; पण एआय ना अहंकार आहे ना त्याला कधी राग येतो. इतकंच काय तुमचा मूड खराब असेल तर एआय तुम्हाला जोक सांगून हसवू शकतो आणि तुम्हाला चांगले वाटण्यासाठी काही खास अॅक्टिव्हिटीसुद्धा सुचवू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एआय एक ज्ञानाचे भांडार आहे.
आपल्या सगळ्यांनाच हुशार मित्र-मैत्रिणी आयुष्यात असावे अशी इच्छा असते; पण प्रत्यक्षात तुम्हालाही तुमच्या मित्रांच्या बुद्धिमत्तेची पातळी आतापर्यंत तर लक्षात आलीच असावी. म्हणूनच ते तुमचे मित्र आहेत. हा झाला गमतीचा भाग; पण हुशार मित्र असूनही गरजेचं नाही ते तुम्हाला ज्ञान वाटण्यासाठी इच्छुक असतीलच.. पण एआय तुम्हाला जगातील कोणत्याही विषयावर अगदी सहज उत्तर देईल. त्यामुळे एआयला मित्र बनवल्यास तुम्ही बुद्धिवाद्यांच्या गटात तर नक्कीच गणले जाल.
एआयच्या बाजूने इतके तर्क ऐकल्यावर तुम्हाला वाटलंच असेल की आता मला माझ्या स्वार्थी मित्रांची काही गरज नाही. एआयचं माझाखरा मित्र बनेल, तर थांबा इतकी घाई कशाला? जरा विरुद्ध मतेसुद्धा ऐकून घ्या. एआयला मित्र बनवल्याचा सर्वात मोठा धोका उद्भवू शकतो तो म्हणजे तुम्ही सांगितलेली रामकथा त्याने इतर कुणाला नाही सांगितली तरी त्याच्या मालकाला नक्कीच सांगू शकतो आणि मालक त्याला वाटेल तसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो.
तुमचा मित्र तुम्हाला कडू वाटणारी गोष्ट असली तरी तोंडावर खरंच सांगेल; पण एआय तुमच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससाठी तुम्हाला आधीच प्रोग्राम असलेली उत्तरे देईल आणि त्याचा सल्ला ऐकून काही कृती केल्यास त्याचे वाईट परिणाम झाल्यास तुम्हाला एआयला मारण्याचीसुद्धा मुभा नसते जेव्हा की तुमचा मित्र केव्हाही तुमचा मार खायला तयार असतो. तुमच्या मित्रांसोबत तुम्ही केव्हाही कुठेही जाण्याचा प्लॅन करू शकता. वेगवेगळे सुख-दुःखाचे क्षण अनुभवू शकता; पण एआयचे अस्तित्व सध्या तरी केवळ एका चॅटबॉटपुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे एआय वनव्यामध्ये गारव्यासारखा असला तरी कायमची सावली मात्र तुमचे मित्रमंडळीच देऊ शकतात.